कृष्णा जाधव (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई)
अश्वत्थ वृक्ष, संसाराचं एक सुंदर रूपक माऊलींनी सहजगत्या उभं केलं. तेवढ्याच सहजतेने त्याचं मिथ्यत्वही मांडलं. अज्ञान जीवाच्या ठायी असेपर्यंत संसाराचं अस्तित्व. अफाट, अनंत अनादी अश्वत्थ वृक्ष ‘ज्ञानप्रकाशाच्या’ सान्निध्यात येताक्षणी नाहीसा होतो. एका आत्मज्ञानावाचून संसार मिथ्यत्वावर प्रकाश टाकणारी अन्य बाब नाही. अज्ञान-ज्ञान-बुद्धी-वैराग्य-ब्रम्ह हे टप्पे आपण गतलेखात वाचलेत. ब्रम्हज्ञान प्राप्तीनंतर सापडणारे ‘परमधाम’ आजच्या लेखात...!!!
॥ श्री ॥
संसार कळायला सोपा पण वळायला सहजसाध्य अजीबात नाही. ‘ज्ञान’ हे आपल्या अंतःकरणात असलं तरी ते प्राप्त करण्यासाठी शेकडो वर्षे जन्म ‘झुंजावे’ लागते. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर आरुढ होण्यासाठी काम-क्रोध-मद-मत्सर-दंभ-अहंकार या षड्रिपूंचा निःपात करावा लागतो. बुद्धी-वैराग्य-ज्ञान यांची संगत करावी लागते. गंमत अशी आहे की, हे साम्राज्य अत्यंत जवळ वाटत असलं तरी भल्या भल्या सत्पुरुषांना हे प्राप्त होत नाही; जे त्यासाठी संपूर्ण जीवनाचं सर्वस्व वेचण्यांसाठी सिद्ध असतात.
तुमच्या-आमच्यासारख्या साधकांना मग ते साध्य होईल का? ही साधना मुळात जन्मोजन्मीच्या पुण्याईनेच मिळते. भगवंताचे नाम असेच मुखात सहजसाध्य नाही. जरी नाम मुखात यायचे असेल तरी त्यासाठी ‘मन’ तयार करावेच लागेल. मान आणि मोह यात ‘मनाची’ मान सतत अडकलेली असते. ती सोडवण्यासाठी ‘नाम साधना’ महत्वाची. तीच आपण करत नाही. माऊली हरिपाठात म्हणतात -
अनंत जन्माचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥
नामस्मरणासारखे उत्तम साधन या कलीयुगात दुसरे काही नाही, पण त्यासाठी ‘मन’ तयार करावे लागते. नित्यनेमाने इंद्रियांना नामस्मरणासाठी वळण लावावे लागते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज असते.
असो ! आत्मज्ञानास प्राप्त झालेल्या जीवाच्या लक्षणांचा मात्र आपण ऊहापोह करणार आहोत. माऊली म्हणतात ज्या साधकाचे मन मोह आणि मान या दोन गोष्टीचा त्याग करते. ज्याने आसक्तीला जिंकले, ज्याची कामना समुळ नष्ट झाली, जे सुख-दुख द्वंद्वापासून मुक्त झाले असा साधकच ज्ञानी सत्पुरुष अविनाशी परमपदाला प्राप्त होतो.
जया पुरुषांचे का मन।
सोडोनी गेले मोह मान।
वर्षाती जैसे घन। आकाशाते ॥
आत्मज्ञानास प्राप्त झालेल्या सद्पुरुषांची लक्षणे खालीलप्रमाणे.
1) सत्पुरुष मोह आणि मान, सन्मान यांच्यापासून फार दूर असतात. किंबहुना या दोन्ही गोष्टींचा निःसंशय त्यांनी त्याग केलेला असतो. सर्वसामान्य आणि सत्पुरुष किंवा आत्मज्ञानी पुरुषांमधील हा ठळक भेद, तुमच्या-आमच्या सहज लक्षात येणारा आहे.
मानसन्मानाच्या पाठी आम्ही आयुष्यभर धडपडत असतो. त्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही किंबहुना मान, सन्मान प्राप्ती हेच आमच्या जीवनाचे ध्येय होवोन बसलेलं असते. ते मिळवण्यासाठी आम्ही अविरत कष्ट करत असतो संत किंवा आत्मज्ञानी आपल्या कर्माकडे कर्तव्य परायणतेनं पाहतो. त्यामधून त्याची निस्सीम कर्तव्यतत्परता, सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा यांची साक्ष पटत असते.
कर्तव्य किंवा कर्माशी त्याचा संबंध हा फक्त निस्सीम प्रेमानं केलेली ‘कृती’ हाच असतो. त्या कर्मामधून जे ‘फळ’ मिळणार आहे, त्याकडे पाहून कर्म तो कधीच करत नाही. कर्माप्रती ना मोह असतो, ना आसक्ती, ना त्यामुळे मिळणारा मान, सन्मानावर डोळा. सत्पुरुष आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या वर्तनामधील हा ठळक दिसणारा आणखी एक मोठा फरक.
2) ज्ञानी, प्रतिभावंत, आत्मज्ञानी किंवा सत्पुरुष ‘विकार’ चक्रात सापडत नाही. विकारचक्राची रचना पुढीलप्रमाणे असते. विकारांची
(काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर-दंभ-अहंकार) पुनरावृत्ती या विकारचक्रात होत असते.
इंद्रीय-स्पर्श : मन आणि इंद्रिये जेव्हा बाह्य विषयांना स्पर्श करतात तेव्हा इच्छा निर्माण होतात. उदा : सुंदर वस्तू दिसली की, मन आकर्षित झाले.
इच्छा-आसक्ती : इच्छेची पुनरावृत्ती आसक्तीत बदलते. आसक्ती म्हणजे त्या गोष्टीशिवाय समाधान न मिळणे.
आसक्ती-अपेक्षा
अपेक्षा पूर्ण न झाल्यास क्रोध.
क्रोधापोटी मोह जन्मास येतो.
मोहातून स्मृती भ्रंश.
स्मृतीभ्रंशातून बुद्धीनाश.
बुद्धीनष्ट झाली की सर्वनाश अटळ.
या विकार चक्राचा नाश हा प्रज्ञावंतांनी किंवा आत्मज्ञानी संत सत्पुरुषांनी खालील साधनाद्वारे केलेला असतो -
अ) स्मरण
ब) सात्विक जीवन
क) वैराग्य
ड) ध्यान व नामस्मरण
ई) सत्संग
3) ‘लोभ’ हा कायमस्वरूपी नष्ट झालेला असतो.
4) सत्पुरुषांनी विकल्पांचा त्याग केलेला असतो.
5) भेदबुद्धीचा त्याग.
6) देहावरील आसक्तीचा अविद्येसह त्याग
7) अज्ञानजन्य द्वैताचा त्याग.
8) सुख-दुःखरूपी द्वंद्वांपासून मुक्त.
9) पाप आणि पुण्यामध्ये आत्मज्ञानी अडकत नाही कारण त्याची कर्म ‘निष्काम’ स्वरूपी असतात.
10) हर्ष आणि शोकरहीत त्याचे जीवन असते.
11) ज्ञानस्वरूपात सदैव तृप्त राहून आत्मानंदात सदैव मग्न.
12) आपल्या ठिकाणी ‘एकतत्वाने’‘भगवंतास’ पाहण्याची दृष्टी.
13) यांचा विवेक आत्म्याच्या निश्चयात तद्रूप.
14) यांच्या अंतःकरणात विषयांची आणि कामवासनेची इच्छा
राहात नाही.
15) सर्व विश्व सच्चिदानंद स्वरूप असल्याची जाणीव त्यांना अहोरात्र असते.
सत्पुरुषांच्या वरील लक्षणांवरून ते जगापेक्षा वेगळे का असतात ते आपणास समजते. हेच लोक ‘परमधामाला’ प्राप्त होतात.
रामकृष्णहरी