

खानिवडे : ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्याचा प्रसिद्ध असणारा भुई दरवाजा म्हणजेच किल्ल्याचे प्रवेशद्वार असलेल्या महादरवाजाच्या कमानीला तडा व भेगा गेल्या आहेत. यामुळे वसईच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष मिळवून देण्यासाठी प्रवेश करवणारा हा दरवाजा अखेरची घटका मोजण्यास मार्गक्रमण करीत असल्याची खंत इतिहास प्रेमी व दुर्गमित्र बोलून दाखवत आहेत.
याबाबत बोलताना इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत म्हणाले की, किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत सन 2018 साली याबाबत केंद्रीय पुरातत्व विभागास तातडीने संवर्धनासाठी विनंती सूचना देण्यात आल्या होत्या. याबद्दल विविध वृत्तपत्रांत वृत्त ही प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पुरातत्व विभागाने प्रवेशद्वाराच्या समोरच्या अंगाने वरवरून सिमेंटने मजबुती देण्याचे काम केले होते. मात्र ते काम तकलादू ठरले असून संवर्धन झाल्याची धूळफेक केली होती. गेली तब्बल 100 वर्षांत केंद्रीय पुरातत्व विभाग मुंबई अंतर्गत एकदाही या महादरवाज्याच्या योग्य संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
किल्ले वसई मोहिमेकडून 2018 पासून या बाबत आवश्यक सूचना पुरातत्व विभागास देण्यात आली आहे. मात्र विभागाकडून यावर कोणतीही सकारात्मक अंमलबजावणी झालेली नाही. महादरवाजाच्या वरच्या अंगास मोठ्या प्रमाणावर अनावश्यक झाडी, काटेरी झुडुपे, वेली, धोकादायक जीवजंतू यांचा धोका वाढला आहे. वाढत्या झाडांची सर्व मुळे प्रवेशद्वार कमानी मधून मार्गक्रमण करीत दगड चिरे मोकळे करीत आहे. या भेगा वाढत जाऊन लवकरच मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे वरील चर्या, तटबंदी, बुरूज, फांजी, कमानी यांचे मोठे नुकसान होणार अशी शंका दुर्गमित्र बोलून दाखवत आहेत . वरील तटबंदीवर किंचित सुद्धा चालता येत नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
कित्येक वर्षांपासून या प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा पुरातत्व विभागाने दुरुस्तीसाठी नेला होता. तो गोदामात सडून संपला. जंजिरे वसई किल्ल्याच्या महादरवाज्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष आगामी काळात या वास्तूला धोकादायक ठरणार आहे. या प्रवेशद्वारास मराठेकाळात महादरवाजा या नावाने संबोधले जात असल्याचे संशोधन उल्लेख नुकताच राऊत यांनी प्रसिद्ध केले होते. किल्ले वसई मोहीम अंतर्गत गेली अनेक वर्षे जंजिरे वसई किल्ल्यातील तटबंदीवरील धोकादायक झाडे काढण्यासाठी आमचे श्रमदान वेळोवेळी करण्यात येत आहे.असेही त्यांनी सांगितले.