Palghar Crime : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह; अल्पवयातच प्रसुती
वाडा : वाडा तालुक्यातील परळी गावातील एका अल्पवयीन कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीवरून आता पतीसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात आजही अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिली जातात हे वास्तव आहे. परळी गावातील एका मुलीचे अवघ्या 14 व्या वर्षी गावातील एका दलालाने मध्यस्थी करून संगमनेर तालुक्यातील जीवन गाडे नावाच्या तरुणाशी फूस लावून जबरदस्तीने विवाह लावून दिला. आई व सावत्र बापाने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला मात्र बदनामीच्या धास्तीने त्यांनी बळजबरीने या विवाहाला होकार दिला.
लग्नाच्या काही दिवसांनी अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यावर सरकारी दवाखान्यात नोंदणी करण्यासाठी पतीने वयात बदल करून तिचे खोटे आधारकार्ड बनविले. परळी, वाडा व पुढे जव्हार येथे अखेर या मुलीची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर पती जीवन याने आपल्या पत्नीचा प्रचंड छळ सुरू केला. मारहाण, शिवीगाळ व उपासमार याला कंटाळलेल्या या मुलीवर तिचा पती चरित्रावरून संशय घेऊ लागला.
29 सप्टेंबरला अखेर आपल्या मामेभावासोबत ही मुलगी आपल्या घरी आली व तक्रार दाखल केली. वाडा पोलिसांनी जीवन गाडे (रा. सावरगावतळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर), चुलत सासू शोभा गाडे, चुलत सासरा अमोल गाडे व परळी गावातील रवि कोर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट मोडवर येत दलालांच्या मार्फत किती मुली पीडित झाल्या आहेत, यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी केली आहे.

