ठाणे

Thane News : नोंदणी झालेल्या गर्भवती जातात कुठे ? आशा सेविका शोध घेणार

अविनाश सुतार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे  (Thane News) महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात प्रसूतीसाठी पूर्व नोंदणी करणाऱ्या गर्भवतींची संख्या ही ३६ हजारांच्या घरात असली तरी प्रत्यक्षात होणाऱ्या प्रसूतींची संख्या मात्र २२ हजारापर्यंतच असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित गर्भवती जातात कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेच्या अंतर्गत या गर्भवतींचा शोध घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला असून यासाठी आशा सेविकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी आशा सेविकांना प्रत्येक केसमागे शंभर रुपये महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या (Thane News)  आरोग्य विभागाच्या दप्तरी दरवर्षी ३५ ते ३६ हजार गर्भवतींची नोंदणी होत असते. त्यातील २२ हजारांच्या आसपास मातांची महापालिका हद्दीत प्रसूती देखील होते. यापैकी ८ हजारांच्या आसपास मातांची महापालिकेच्या रुग्णालयात इतर महिलांची खासगी रुग्णालयात प्रसूती होत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. परंतु आता या योजनेचा भाग म्हणून महापालिका अशा नोंदणी झालेल्या मात्र प्रसूती महापालिका हद्दीत न झालेल्या मातांचा शोध घेणार आहे.

प्रसूतीचे निदान झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात या गर्भवती नोंदणी करत असतात. मात्र, एकदा नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात प्रसूतीचे प्रमाण मात्र नोंदणीपेक्षा कितीतरी कमी असल्याने अशा मतांचा शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी ही महत्वाची भूमिका आशा सेविका बजावणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Thane News  : आशा सेविका काय करणार ?

महापालिका हद्दीत रुग्णालयात प्रसुतीसाठी नोंदणी केली जाते. मात्र नोंदणीनंतर अशा माता दुसरीकडे जातात, त्या कुठे जातात, त्यांच्या प्रसुतीची स्थिती कशी आहे, याची माहिती आशा वर्कर घेणार आहेत. यासाठी प्रत्येक प्रसूती माते मागे आशा वर्करला १०० रुपये महापालिका देणार आहे. जेणे करुन त्या माता कुठे आहेत, त्यांची प्रसुती कुठे झाली, त्यांची प्रकृती कशी आहे, याची माहिती या माध्यमातून घेतली जाणार आहे.

१२ आठवड्यांच्या आत नोंदणी

आशा वर्करकडून प्रसुतीच्या मातांची १२ आठवड्याच्या आत नोंदणी करण्यासाठी देखील मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार यासाठी प्रत्येकी २५ रुपये दिले जाणार आहेत. यात नोंद झाली नसेल, तर नोंदणीसाठी देखील या आशा वर्कर मदत करणार आहेत.

जोखमीच्या माता

यात काहींना जुळे मुले होणार असतात, काहींना प्रसुती दरम्यान होणारे वेगवेगळे त्रास होत असतात. त्यानंतर प्रसुतीचे निदान झाल्यानंतर आई आणि बाळाची तब्बेत चांगली आहे किंवा काही त्रास आहे का? याची तपासणी करणे गरजेचे असते. ते काम आशा वर्करच्या माध्यमातून झाल्यास त्यापोटी प्रती ५०० रुपये दिले जाणार आहेत.

प्रसुती मातेच्या खात्यात जाणार ६ हजार रूपये

प्रसुती दरम्यान एखाद्या प्रसुती मातेस वेगवेगळ्या प्रोटीन्सची गजर भासते. त्यानुसार या प्रोटीन्सची गरज भागविण्याचे कामही महापालिका करणार आहे. या मातांचा शोध घेतला जाणार असून ज्यांना गरज असेल. त्यांनाच ४ ते ९ महिने गरोदरपणात ६ हजार रुपये गरोदर मातेच्या थेट खात्यात जमा होणार आहेत.

Thane News  : अडचणीची प्रसुती

अडचणीची प्रसुतीसाठी आता महापालिकेच्या कोपरी येथील प्रसुतीगृहात १२ खाटा एनआयसीयु आणि ६ खाटा स्टेप डाऊनच्या असणार आहेत. तसेच ८ तास प्रसुतीतज्ञ कोपरी, वर्तक, मुंब्रा, कौसा आदी ठिकाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT