शाम धुमाळ
कसारा: मध्य रेल्वेने आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी घेतलेल्या 13 तासांच्या मेगाब्लॉकमुळे शनिवारी आसनगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अक्षरशः कोंडमारा झाला.
आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्याने शेकडो प्रवासी स्थानकात अडकून पडले. त्यातच स्थानकावरील पंखे, लिफ्ट आणि एस्केलेटर बंद असल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.
शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रविवारी पहाटे 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईहून नाशिक व कसाराकडे जाणारे तसेच कसाराहून मुंबईकडे जाणारे हजारो प्रवासी आसनगाव स्थानकावर एकत्र आले. वीकेंड आणि प्रचंड उकाड्यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले पंखे बंद, लिफ्ट आणि एस्केलेटर बंद, तसेच गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत किंवा मेगाब्लॉकसंदर्भात नियमित उद्घोषणाही होत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठी गैरसोय झाली. मेगाब्लॉकच्या नावाखाली प्रवाशांची अशी फरफट होत असेल, तर प्रशासनाने किमान मूलभूत सुविधा आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था तरी करावी, अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.
एक किलोमीटरची पायपीट
मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक प्रवाशांना आसनगाव स्थानकातून तब्बल एक किलोमीटर पायी चालत मुंबई-नाशिक महामार्ग गाठावा लागला. 42 अंश सेल्सिअस तापमानात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवासी रस्त्यावर उभे राहून वाहनांना हात दाखवत प्रवासाची व्यवस्था करत होते. या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.
एसटी महामंडळाची उदासीनता; खासगी वाहनचालकांची चांदी
रेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर असतानाही एसटी महामंडळाने आसनगाव-कसारा, कसारा-आसनगाव तसेच नाशिककडे अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली नाही. शहापूर, इगतपुरी आणि नाशिक आगारांकडून कोणतीही विशेष व्यवस्था न झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अवघ्या 30 किलोमीटरच्या प्रवासासाठी 150 ते 200 रुपये आकारत प्रवाशांची अक्षरशः लूट केल्याचे चित्र दिसून आले.