Political News Pudhari
ठाणे

Political News: राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळ आनंद परांजपे यांना देण्यास विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण या संस्थेच्या उपाध्यक्षपदासाठी आनंद परांजपे यांची नियुक्ती करू नये असे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: राज्यातील महायुती सरकारमध्ये महामंडळ वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण या संस्थेच्या उपाध्यक्षपदासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव सुचविले होते.

मात्र परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील कोट्यातील महामंडळावर परांजपे यांची नियुक्ती करू नये, या असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण या संस्थेच्या उपाध्यक्षपदासाठी आनंद परांजपे यांची नियुक्ती करू नये असे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

याबाबत आनंद परांजपे म्हणाले काय पत्र पाठविले आहे, याची मला कल्पना नसून केवळ माध्यमातून ऐकले आहे. मी 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले, पक्षाबद्दल कुठलीही कटुता नसून शिवसेनेत घर वापसी केलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांना विचारणा केली असता ते म्हणाले परांजपे यांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही.

जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्र गेले असेल तरी ते योग्य आहे. परांजपे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची शिफारस ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून केलेली आहे. परांजपे हे आता सेनेत गेल्याने ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसची राखीव ठेवावी, कुठलीही नियुक्ती करू नये हे सांगणे योग्यच असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारकडून प्रलंबित असलेल्या महामंडळ वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रक्रियेत पुढाकार घेत मित्रपक्षांना जागावाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

याच घडामोडींदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कोट्यातून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण या संस्थेचे उपाध्यक्षपद आनंद परांजपे यांना दिले जाणार होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या एका योग्य उमेदवाराचे नाव पक्षाकडून लवकरच सुचवले जाईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT