डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने येथील लहुजीनगर भागात असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी रात्री टोपी घालणे आणि ती बदलण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान राडा झाला.
हा सारा प्रकार मंगळवारी रात्री साडे आठच्या दरम्यान सुरू होता. राड्याच्या वेळी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणासह त्याची मावशी देखील जायबंदी झाली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या संदर्भात मोनू शंकर फुलारी (21) नामक तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा उर्फ नबाब अस्लम शेख (24), शब्बीर अस्लम शेख (35), अफसर अस्लम शेख (30), शाहरूख अस्लम शेख (27) या तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार मोनू फुलारी याचा मित्र बिगर कांंबळे याने घातलेली टोपी बाबा उर्फ नवान शेख याने डोक्यातून काढून स्वत:च्या डोक्यात घातली. आपल्या मित्राची टोपी बाबा याने काही कारण नसताना काढून घातली म्हणून ती टोपी मोनू फुलारी याने बाबा शेख याच्या डोक्यातून काढून पुन्हा बिगर कांबळे याच्या डोक्यात घातली.
टोपी डोक्यातून काढण्याच्या आणि टोपीची फिरवाफिरव करण्याच्या प्रकाराचा नवाब शेख आणि त्याचे भाऊ अफसर, शब्बीर आणि शाहरूख यांना राग आला. त्यांनी टोपी काढल्याचा मोनू फुलारी याला जाब विचारला. मोनू याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेले नवाब शेख, अफसर, शब्बीर, शाहरूख यांनी शिवीगाळ करत मोनूवर हल्ला चढविला व त्याला जबर जखमी केले.
भाच्याला वाचविणाऱ्या मावशीला केले लक्ष्य
आपल्या भाच्यावर होत असलेला जीवघेणा पाहून त्याला वाचवायला मावशी सरसावली. मावशी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्याने शाहरूख आणखीच पिसाळला. त्याने मावशीला मारहाण केली. या हल्ल्यात मावशी देखील जबर जखमी झाली. एकीकडे पुतण्या मोनू आणि त्याच्या मावशीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. मावशीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात मोनू फुलारी याने दिलेल्या जबानीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर अद्याप हाती लागले नसून पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.