

ठाणे : जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड ट्रान्स्पोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात माहिती तंत्रज्ञान व स्मार्ट सिटी नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्यासाठी अधिकृत करार करण्यात आला. या करारामुळे ठाण्यातील डिजीटल गव्हर्नन्स, नागरिक सेवा अधिक प्रभावी करणे आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकासाला नवी गती मिळणार आहे.
जपानमध्ये पार पडलेल्या समारंभात जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड ट्रान्स्पोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आला. या समारंभास इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे डेप्युटी मिनिस्टर कावामुरा केनिच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव, आयएएस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. टीएमसीच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना त्यांनी दिलेल्या धोरणात्मक दिशेमुळे हा करार अधिक बळकट झाला असून त्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्याबाबत ठाणे महानगरपालिकेची कटिबद्धता प्रकर्षाने दिसून आली असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या सहकार्य कराराअंतर्गत इन्फॉर्मेशन प्रोजेकट् आणि ठाणे महानगरपालिका संयुक्तपणे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, प्रणाली विकास, क्षमता, वृद्धी, ज्ञान आदानप्रदान, तसेच ठाणे शहराच्या गरजांनुसार अत्याधुनिक डिजिटल उपायांची प्रायोगिक अंमलबजावणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत.
या भागीदारीमुळे नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा जलद प्रसार होऊन ठाण्यात कार्यक्षम, लवचिक आणि नागरिक-केंद्रित शहरी प्रशासन प्रणाली विकसित होण्यास मदत होणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
भारत-जपान सहकार्यातीलनवे पर्व सुरू
ठाणेच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी राबविलेली धोरणात्मक दिशा आणि दृष्टीकोन या करारामध्येही ठळकपणे उमटल्या असून आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्याबाबत ठाणे महापालिका कटिबद्ध असेल, असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या स्वाक्षरी करारामुळे भारत-जपान सहकार्यातील नवे पर्व सुरू झाले असून आगामी काळात प्रभावी डिजिटल प्रकल्प व सामायिक तांत्रिक प्रगतीचा मार्ग अधिक दृढ होणार आहे.
नाविन्यपूर्ण प्रकल्प अंमलबजावणीत सहकार्य
या करारानुसार दोन्ही संस्थामध्ये आयसीटी आधारित उपाययोजना, स्मार्ट शहरी व्यवस्थापन, तांत्रिक ज्ञान-विनिमय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य केले जाणार आहे. हा पुढाकार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत स्मार्ट सिटी ठाणेचे सीईओ संदीप माळवी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे, सल्लागार संस्था मेसर्स पलाडियम यांनी (एमओसी) सहकार्य कराराचा मसुदा तयार करणे व समन्वय साधणे यात महत्वपूर्ण योगदान दिले.