अंबरनाथ: लहान शहरे आणि उपनगरांमध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची कधीच कमतरता नव्हती; खरी कमतरता होती ती त्या गुणवत्तेला आकार देणाऱ्या आधुनिक व्यासपीठाची आणि दर्जेदार सोयीसुविधांची.
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरातील शेकडो होतकरू खेळाडूंना आजवर केवळ चांगल्या ट्रॅकवर धावण्यासाठी किंवा सुसज्ज मैदानावर सराव करण्यासाठी ठाणे किंवा मुंबईची वारी करावी लागत होती.
लोकलच्या गर्दीतून प्रवास करून सरावाच्या ठिकाणी पोहोचण्यातच या खेळाडूंची अर्धी ऊर्जा खर्च व्हायची. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. अंबरनाथ पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर उभारले जाणारे अद्ययावत क्रीडा संकुल केवळ एक वास्तू नसून, स्थानिक क्रीडा संस्कृतीला नवी झळाळी देणारा ऐतिहासिक टप्पा ठरत आहे.
कोणत्याही शहराचा विकास केवळ रस्ते, पूल किंवा इमारतींवरून मोजला जात नाही, तर त्या शहरातील तरुणाईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तिथे काय सुविधा आहेत, यावरूनही ठरतो.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधांसोबतच क्रीडा क्षेत्राच्या विकासावर दिलेला भर याचेच द्योतक आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि सुमारे ३३ कोटी रुपयांच्या निधीतून नेताजी मैदानाच्या तब्बल सात एकर परिसरात हे सर्वसमावेशक क्रीडा संकुल साकारत आहे. खेळाडूंना आपल्याच शहरात, घरापासून हाकेच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सराव करता यावा, हा या प्रकल्पामागचा मुख्य विचार आहे.
रात्रीचा सराव आणि व्यावसायिक नियोजनाची जोड
या क्रीडा संकुलाचे आणखी एक महत्त्वाचे बलस्थान म्हणजे मैदानावर उभारलेली भव्य प्रकाशव्यवस्था (फ्लडलाइट्स). आजच्या काळात अनेक गुणी खेळाडू शिक्षण किंवा नोकरी सांभाळून खेळाची आवड जोपासतात. दिवसाच्या वेळेत महाविद्यालय, शाळा किंवा कामामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळत नाही.
अशा खेळाडूंसाठी रात्रीच्या वेळी सराव आणि स्पर्धा आयोजित करण्याची सुविधा अत्यंत वरदान ठरणार आहे. याशिवाय, मोठ्या स्पर्धांच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संकुलातच सुमारे ४०० दुचाकी आणि १४४ चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी
जेव्हा एखाद्या शहरात अशी भव्य आणि अद्ययावत व्यवस्था उभी राहते, तेव्हा त्याचा थेट परिणाम स्थानिक खेळ आणि खेळाडूंच्या मानसिकतेवर होतो. अंबरनाथमधील हे संकुल केवळ अंबरनाथपुरते मर्यादित न राहता बदलापूर, उल्हासनगर आणि कल्याण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठीही मुख्य केंद्र ठरेल.
स्थानिक, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन येथे होऊ शकणार असल्याने नवोदित खेळाडूंना घरच्या मैदानावर मोठ्या स्पर्धांचा थरार आणि दबाव अनुभवता येईल. प्रवासाचा ताण कमी होऊन तोच वेळ आणि ऊर्जा थेट सरावावर खर्च होईल, तेव्हा या मातीतून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा फडकवणारे खेळाडू घडणे ही केवळ शक्यता राहणार नाही, तर तो विश्वास ठरेल. अंबरनाथच्या क्रीडा क्षेत्रासाठी उघडलेले हे नवे दालन भविष्यातील चॅम्पियन्सची भक्कम पायाभरणी करणारे ठरेल, यात शंका नाही.
या संकुलाची रचना करताना केवळ एक-दोन खेळांपुरता विचार न करता विविध क्रीडाप्रकारांचा समतोल साधला गेला आहे. संकुलातील मैदानी अर्थात आऊटडोअर विभागाचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही झाले आहे.
यामध्ये फुटबॉलसाठी ६८ बाय १०५ मीटरचे सुसज्ज मैदान आणि ॲथलेटिक्सच्या धावपटूंसाठी ४०० मीटर लांबीचा आठ पदरी (८-लेन) धावमार्ग तयार करण्यात आला आहे. ज्या धावपटूंना आजवर कच्च्या मातीवर सराव करावा लागत होता, त्यांना आता अधिकृत मोजमापाच्या ट्रॅकवर स्वतःचा वेग आजमावता येणार आहे. मैदानावर सुमारे ४०० प्रेक्षकांच्या बसण्याचीही व्यवस्था आहे.
दुसरीकडे, या संकुलातील इनडोअर स्टेडियमचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या काही महिन्यांत ते खेळाडूंसाठी खुले होईल. ४० बाय ६० मीटर आकाराच्या या बंदिस्त स्टेडियममध्ये एकाच वेळी सुमारे ६०० प्रेक्षक बसू शकतील.
विशेष म्हणजे, यात व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक्स आणि दोरखेच अशा वैविध्यपूर्ण खेळांच्या सरावाची सोय असेल. म्हणजेच पावसाळा असो वा कडक उन्हाळा, खेळाडूंचा सराव वर्षभर अखंड सुरू राहू शकणार आहे.