Ambernath Chemical Gas Leak Pudhari
ठाणे

Ambernath Chemical Gas Leak: अंबरनाथमध्ये पुन्हा विषारी केमिकल गॅसचा फैलाव; नागरिक संतप्त, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

मोरीवली एमआयडीसीतील कारखान्यांमधून वायू उत्सर्जनाचे आरोप; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर टीका

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : येथील मोरीवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमधून थेट वातावरणात सोडण्यात येणाऱ्या विषारी वायूमुळे शहराच्या पूर्व भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या सगळ्या प्रकाराचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मात्र ओळखतेही सोयर सुतक नसल्याचेच दिसून येत आहे. या विषारी वायू बाबत स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी देखील अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तक्रारीची देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने दखल घेतलेले नाही.

अंबरनाथ शहर चार ही बाजूंनी एमआयडीसीने वेढले आहे. त्यात केमिकल कारखाने राजरोसपणे प्रदूषण पसरवत असताना देखील त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस अशी कोणतीच शासकीय यंत्रणा कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसून येत नाही. त्यामुळे अश्या प्रदूषण पसरवणाऱ्या केमिकल कारखान्यांचे चांगलेच फावले आहे. कंपनीतील विषारी वायू व केमिकल वेस्ट खुलेआम वातावरणात थेट सोडले जात असल्याने भ्रष्टाचाराचे पाणी कुठेतरी मुरत असल्याची शंका उपस्थित होत आहे.

शहराच्या पश्चिमेला असलेल्या मोरीवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्या राजरोसपणे घातक केमिकल थेट खुल्या वातावरणात सोडत असतात. कुणी तक्रार केली की, तेवढ्यापुरते बंद करायचे आणि पुन्हा जैसेथे परिस्थिती. या प्रकारामुळे आसपासच्या नागरी वस्तीमध्ये नागरिकांना श्वसनाचे विकार झाले आहेत.

त्यामुळे येथील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. असे असताना देखील कोणतेही स्थानिक प्रशासन यावर ठोस कारवाई करत नसल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.

अधिकाऱ्यांचे दुसऱ्यांकडे बोट

मोरीवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्या हवेत विषारी वायु सोडत असल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण येथील विभागीय अधीकारी जयवंत हजारे यांना विचारले तेव्हा त्यांनी आपली जबाबदारी झटकून तिथे एका अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तुम्ही त्यांना विचारा असे बोलले. अधिकाऱ्यांच्या अश्या बेजबाबदारपणाला शासन जबाबदार ठरवेल की, ते देखील त्याकडे कानाडोळा करतील असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT