नवी मुंबई : काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. pudhari photo
ठाणे

Ravindra Chavan : अंबरनाथ काँग्रेसमुक्त करून दाखवले

रवींद्र चव्हाण; काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथचे सर्व नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर भाजपात आले आहेत. त्यामुळे अंबरनाथ काँग्रेसमुक्त झाले आहे, असा शाब्दिक हल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला, तर त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच काँग्रेसयुक्त झाल्याचा प्रतिहल्ला केला.

गुरुवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील व्हाईट हाऊसवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अंबरनाथ येथील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी गुरुवारी दुपारी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर भाजप सोबत आल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. आम्हाला काँग्रेसने विचारणा केलीच नाही. आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय का केला, याबाबत आमच्याशी कुणीच बोलले नाही. शिवसेनेने मागील काही वर्षे विकास न केल्याने आम्ही भाजपसोबत जाणार होतो, मात्र पक्षाने थेट निलंबन केल्याने आम्हाला गट स्थापन करून भाजपामध्ये यावे लागले. शिंदेंच्या शिवसेनेने आम्हाला फोन करून येण्यास सांगितले होते. मात्र तोपर्यंत आमचा निर्णय झाला होता. आम्हाला निवडणुकीत पक्षाने कसलीच मदत केली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या कामावर निवडून आलो आहे, अशी पुस्तीही या नगरसेवकांनी जोडली.

अंबरनाथमध्ये थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनंतर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत भाजपाच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या.

भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड : सपकाळ

अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. भाजपचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी भाजपाने युती केली आहे, असे सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेसने नगरसेवकांवर तत्काळ कारवाई केली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य केले यातून त्यांना सत्तेचा माज आल्याचे दिसते, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

  • सत्तेची समीकरणे जुळवताना भाजपाने शिवसेनेला दूर ठेवत काँग्रेससोबत आपली मोट बांधली. मात्र या अभद्र युतीवर शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.त्यामुळे काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना काँग्रेस पक्षातून निलंबित केले. त्यानंतर या नगरसेवकांना भाजपात विलीन करून घेतले.

  • काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने एक अपक्ष व भाजपाचे 14 नगरसेवक तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 4 असे एकूण 31 नगरसेवक भाजपाकडे असल्याने दुसऱ्या अपक्ष नगरसेवकांसोबत शिवसेनेचे 27 असे एकूण 28 नगरसेवकांसोबत शिवसेना विरोधी बाकावर बसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT