अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला खातेही उघडता आले नाही pudhari photo
ठाणे

Ambernath municipal election results : अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला खातेही उघडता आले नाही

काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाची मतं, उबाठाचे अस्तित्व संपुष्टात आल्याची होतेय चर्चा

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : मागील विधानसभा निवडणुकीत उबाठाने 50 हजार पेक्षा जास्त मतं मिळवली होती. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उबाठा चांगलं प्रदर्शन करून त्यांचे नगरसेवक निवडून आणतील. असे चित्र असताना या निवडणुकीत उबाठाला खातेही उघडता आले नाही. याउलट काँग्रेसने स्वबळावर नगराध्यक्ष पद लढवून त्यांना तब्बल 21 हजार 592 मतं मिळाल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

थेट जनतेतून निवड झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून भाजपाने दणदणीत विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत उबाठा आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन मशाल चिन्हावर लढले असतानाही त्यांना विजयाचा भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये उबाठा चे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून तब्बल 12 नगरसेवक निवडून आणले आहेत.

2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने 8 जागा निवडून आणल्या होत्या. यंदा मात्र काँग्रेसने 12 जागा निवडून आणून आपली ताकद वाढल्याचे दाखवून दिले. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर मनसे मधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि त्यांच्या पत्नी ऍड अपर्णा भोईर हे दोघेही प्रतिष्ठेच्या प्रभागामधून निवडून आले आहेत. कुणाल भोईर यांनी भाजपा चे चेतन चव्हाण यांचा 721 मतांनी पराभव केला. भोईर यांना 1926 तर चव्हाण यांना 1205 मते मिळाली. तसेच अपर्णा भोईर यांनी भाजपा च्या अनिता आदक यांचा पराभव केला. भोईर यांना 1657 तर आदक यांना 1192 मते मिळाली.

17 माजी नगरसेवकांचा पराभव

मुक्कु लेनिन, करुणा रसाळ, स्वप्ना शशांक गायकवाड (शशांक गायकवाड यांच्या पत्नी), संदीप लोटे, सुनील सोनी, याकूब मीरा सय्यद, विलास जोशी, नंदकुमार भागवत, कल्पना गुंजाळ, अनिता आदक, रवींद्र पाटील, अनुपमा शिंदे, पन्ना वारिंगे, सुवर्णा साळुंके (सुभाष साळुंके यांच्या पत्नी), राजेश शिर्के, उमेश गुंजाळ, महादू फसाळे या माजी नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे

भाजपच्या अनिल गायकवाड यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव

प्रभाग क्रमांक 10 ब मधून शिवसेनेचे विकास सोमेश्वर आणि भाजपा चे अनिल गायकवाड यांच्यात प्रमुख लढत होती. अटीतटीच्या या लढतीत सोमेश्वर यांना 1218 तर गायकवाड यांना 1212 इतकी मते मिळाल्याने गायकवाड यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव झाला. तर तिसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसचे भावेश पाटील यांना मिळाली. त्यांना 1051 इतकी मते मिळाली.

काँग्रेसच्या गडात भाजपाचे कमळ फुलले

मोरीवली गाव, न्यू कॉलनी, नेताजी मार्केट परिसर हा प्रभाग मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस च्या ताब्यात होता. या ठिकाणी ऍड. यशवंत जोशी आणि त्यानंतर त्यांचे बंधू विलास जोशी हे निवडून येत होते. मात्र प्रथमच या प्रभागातून भाजपा चे अभिजित करंजुले- पाटील निवडून आले आहेत. अभिजित हे नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचे लहान दिर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT