ठाणे : हिट अँड रनच्या घटनांमुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. तरीही राज्यामध्ये हिट अँन्ड रनच्या घटना घडत आहेत. ठाण्यामध्ये रविवारी (दि.20) मध्यरात्री हिट अँड रनच्या घटनेत एका कारने २१ वर्षीय बाईकस्वाराला चिरडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थाना जवळच ही घटना घडली, असून यातील आरोपी फरार आहे. दर्शन हेगडे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताच्या वेळी दोन कारमध्ये रेस सुरु होती. तसेच कार चालवणाऱ्याने मद्य प्राशन केले होते असा आरोप अपघातातील मृताच्या नेटवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर ठाण्यात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दर्शन हेगडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळमध्ये राहत होता. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नितीन जंक्शन या ठिकाणी दर्शन आपल्या मोटरसायकल वरून चायनीज आणण्यासाठी वागळे येथे गेला होता. यावेळी तो परत येत असताना नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबई कडे जाणाऱ्या (क्रमांक MH 02 BK 1200) या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दर्शनच्या बाईकला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती कि दर्शन जागेवरच ठार झाला. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून तो अद्याप फरार आहे. या प्रकरणात फिर्यादी दिशीत ठक्कर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नौपाडा पोलीस स्टेशन कडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत या घटनेत मृत झालेल्या दर्शनचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कारची रेस लावण्यात आली होती. कार चालवणाऱ्यांनी मद्यप्राशन देखील केले होते.पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. नंबर प्लेट जागेवर मिळून आली तरी आरोपीला अटक केली जात नसल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मृताच्या भावाने सांगितले.