Kalyan-Nagar Highway Accident Pudhari
ठाणे

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. रायते गावाजवळ दोन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन ही दुर्घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Kalyan-Nagar Highway Accident: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-नगर महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आज सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास मुरबाडहून कल्याणच्या दिशेने एक इको प्रवासी गाडी येत होती. ही गाडी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी भरलेली होती. मात्र रायते गावाजवळील नवीन पुलाजवळ अचानक भीषण अपघात झाला. या ठिकाणी दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली.

धडक इतकी जबरदस्त होती की इको गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. काही जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गाडीत अडकून पडले होते.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढून त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या अपघातात मृत आणि जखमी झालेल्या बहुतेक जणांचा संबंध मुरबाड परिसराशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT