

आंबोली : आंबोली घाटात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील निकीता राऊत (११) ही बालिका जागीच ठार झाली तर तिची आई गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर अपघातस्थळी जमलेले आंबोली ग्रामस्थ आक्रमक बनले होते. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी तातडीने धाव घेत सदर परिस्थिती नियंत्रणात आणली.
अपघताची भीषणता पाहून आंबोली परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घाटमार्गात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले व पथकाने घटनास्थळी दाखल होत ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेत ग्रामस्थांना शांत केले आणि वाहतूक सुरळीत केली. मृत निकिता ही युनियन इंग्लिश स्कुल आंबोलीमध्ये इ. ५ वीत शिकत होती. मनमिळावू व हुशार म्हणून ती परिचित होती. अभ्यासाबरोबरच पारंपारिक वाद्य वाजवणे व अभंग गायनाची तिला आवड तिला होती. तिच्या अशा अपघाती निधनाने ग्रामस्थ व शिक्षकांना धक्का बसला आहे.