Tree Cutting Pudhari File Photo
ठाणे

Thane Ring Metro Tree Cutting: रिंग मेट्रोसाठी ३,२१२झाडांवर कुऱ्हाड

भुयारी मार्ग २२०, रुंदीकरणासाठी २९१ झाडांचा बळी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे शहरातील विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी तब्बल ३,७४९ झाडे बाधित होणार असून, त्यापैकी ८४८ झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर २,८९९ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

यामध्ये ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या रायलादेवी तलाव ते बाळकुम दरम्यानच्या कामासाठी ३,२१२ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी २,६९३ झाडांचे पुनर्रोपण, तर ५१९ झाडे तोडण्यात येणार आहेत.

त्यानुसार १७ जून रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ४ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली. आता हे निर्णय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. रस्ते रुंदीकरणासाठी २९१ झाडे बाधित होणार असून, १२४ झाडांचे पुनर्रोपण आणि १६७ झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी दोन वड आणि एका पिंपळासह तीन झाडे तोडली जाणार असून, त्याबदल्यात १९० वृक्षरोपे लावण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांसाठी २४, तर ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी २२० झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी अनुक्रमे २ आणि १५९ झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात भरपाई वृक्षारोपण व संगोपनासाठी संबंधित प्रकल्पांकडून सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT