Supriya Sule On Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्यानं नाराजी व्यक्त करत काँग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा वजा धमकी दिली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे स्वतंत्र्यापासूनचे योगदान सांगत आपल्या भाच्याला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये बराचकाळ होते याची आठवण देखील करून दिली.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'काँग्रेस पक्ष जर संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असेल तर काय हरकत आहे. आपण सर्वजण लोकशाहीवर प्रेम करणारे लोकं आहोत. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष हा जवळून पाहिला आहे. मी, अजितदादा.. साहेब काय बराच काळ काँग्रेसमध्येच होते. मी स्वतः काँग्रेसपक्षाबरोबरच लढले आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आणि मतांनीही निवडून आलेली आहे.'
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'आम्ही सर्व काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. एवढंच नाही तर या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते. यात काँग्रेस पक्षाने आपण जो मोकळा श्वास घेतोय तो तो श्वास आणि स्वातंत्र्य हे काँग्रेस पक्षाची देण आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे योगदान हे फार मोठं राहिलं आहे.'
सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली त्यावेळी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाच्या खासदाराने केले आहे. त्यामुळं हा प्रश्न तुम्ही त्या पक्षाच्या नेत्यांनाच विचारा असं उत्तर दिलं.
दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर वक्तव्य केलं होतं. याबाबत सुप्रिया सुळेंना छेडलं असता त्यांना थेट उत्तर देणं टाळलं. त्या म्हणाल्या 'मी ज्या संस्कारात वाढले आहे. तिथं अनुभवाने कर्तुत्वाने आणि वयाने मोठे असलेल्या व्यक्तींनी एकदा काही बोललं की त्याच्या पुढे बोलयाचं नसतं.'