NCP Internal Conflict Pudhari
महाराष्ट्र

NCP Internal Conflict: सुनेत्रा पवारांचा लेटर बॉम्ब! पटेल, तटकरे पदच्युत? अंतर्गत संघर्ष शिगेला!

निवडणूक आयोगाला कळवलेल्या नव्या कार्यकारिणीत कोणतेच पद नाही

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत वाघाये

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दुखवटा सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सुधारित संरचना कशी असेल, असे नमूद केले होते.

मात्र, याबाबत अनभिज्ञ असलेल्या सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे मार्चमध्ये हाती घेताच 28 जानेवारी ते 10 मार्चपर्यंतचा सर्व पत्रव्यवहार रद्द समजावा, असे निवडणूक आयोगाला कळविले. नव्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कोणतेच पद दिले नसल्यामुळे त्यांना पदच्युत करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सुनेत्रा पवार यांनी, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांचा, तर कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या पदांचा उल्लेख आहे.

याच पत्रात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अन्य काही लोकांची नावे असली तरी त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही. दरम्यान, यापूर्वी जेव्हा अशाच प्रकारचे पत्र अजित पवार यांनी आयोगाला सादर केले होते, तेव्हा पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांचे पदनाम लिहिले होते. ही दोन्ही पत्रे ‌‘पुढारी‌’च्या हाती लागली आहेत.

सुनेत्रा पवार अचानक दिल्लीत

या संपूर्ण पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाल्या. एनडीएमधील वरिष्ठ नेत्यांच्या त्या भेटी घेणार असल्याचे समजते.

नेमके काय घडले?

26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर 10 मार्च रोजी पक्षाने संबंधित ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवताना 28 जानेवारीनंतरचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असेही नमूद केले होते. याच अनुषंगाने सादर केलेल्या नव्या पत्रात केवळ 14 पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत.

या पत्रातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्षा असा उल्लेख आहे. तर शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर कोषाध्यक्ष असा उल्लेख आहे; मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांच्या पदांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला दिसत नाही. तसेच छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे-पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा यांची नावेही पदाशिवायच नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही, त्यांचे नेमके पद काय किंवा पक्ष नेतृत्वाला या माध्यमातून काय सुचवायचे आहे, अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पूर्वीच्या पत्रात काय?

यापूर्वी देखील अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना 20 मे 2025 रोजी एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते. यामध्ये अजित पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे यांच्या नावासमोर राष्ट्रीय सरचिटणीस असा उल्लेख आहे. यांच्या व्यतिरिक्तइतरही 6 नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख आहे.

विशेष म्हणजे ही सर्व पदे नावांसमोर टाईप केलेली आहेत. अजित पवार यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा उल्लेख पदांसह आहे. याउलट सुनेत्रा पवार यांनी आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रात स्वतःच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे यांच्या समोर कोषाध्यक्ष म्हणून हस्तलिखीत उल्लेख केला आहे. अन्य कोणत्याही नावासमोर कुठल्याच पदाचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे घोषीत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद व प्रदेशाध्यक्षपद गेले कुठे, असा प्रश्न त्यातून पुढे येतो.

जय पवार यांना पक्षात महत्वाचे स्थान

पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला जी यादी देण्यात आली त्यामध्ये 9 नेत्यांची नावे आहेत. या 9 नेत्यांमध्ये अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे देखील नाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT