Mungantiwar Fadnavis Meeting: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (23 डिसेंबर) रात्री भेट घेतली. या भेटीनंतर पक्षातील मतभेद दूर झाले असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडियावर मुनगंटीवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेली नाराजी आता दूर होत असल्याचे चित्र आहे.
राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने चांगली कामगिरी केली असली, तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला मोठा फटका बसला. चंद्रपूरमधील 11 नगरपंचायतींपैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, तर भाजपाला केवळ 2 ठिकाणी यश मिळाले. या पराभवामुळे पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली.
या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, पण आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली,” असं विधान त्यांनी केलं होतं. नाव न घेता केलेल्या या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. विरोधकांनीही या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. अशा वातावरणात मुनगंटीवार आणि फडणवीस यांची भेट राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची सविस्तर माहिती जरी सांगण्यात आलेली नसली, तरी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत भेट झाल्याची माहिती दिली. पक्षहित, आगामी राजकीय वाटचाल आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की,
''राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आज भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी दाखवलेल्या या संवेदनशील व दूरदर्शी भूमिकेबद्दल त्यांचे मनस्वी आभार.''
भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही भेट सकारात्मक झाली असून कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर निर्माण झालेला गैरसमज आणि नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरल्याचं बोललं जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षसंघटन आणि राज्यातील राजकीय रणनीती या सगळ्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार–फडणवीस भेटीला विशेष महत्त्व आहे. किमान सध्या तरी भाजपमध्ये नाराजी नाही असा मेसेज देण्याचा प्रयत्न या भेटीतून केला आहे.