घरफोडी  
सोलापूर

सोलापूर : गावडी दारफळमध्ये भर दिवसा दोन घरात घरफोडी; रोख रक्कम, १७ तोळे सोने लंपास

निलेश पोतदार

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा गावडी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करत रोख रकमेसह सोने, चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना काल (शुक्रवार) दुपारी दीड ते अडीच या वेळेत घडली.

दारफळ येथील शेतकरी दत्तात्रय नामदेव भोरे व कुटुंबातील सर्वजण शेतात शेतकामासाठी गेले होते. यावेळी बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कटावणीच्या साह्याने कपाटातील सोन्याचे नेकलेस, गंठण, असा एकूण सहा ते सात तोळे सोने, रोख ५० हजार, तर कांदे विक्री केलेला ४० हजार रुपयांचा चेक असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तर त्याच गल्लीतील बाजूला राहणाऱ्या अक्षय जगताप यांच्याही घराचा कडी, कोंयंडा उचकटून चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या सोन्याची माळ, गंठण, १७ ग्रॅमचे नेकलेस, अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, अंगठी, चांदीचे अलंकार असा दहा तोळे तर रोख वीस हजारावर रपयांवर डल्ला मारला. दोन्ही परिवारातील 17 तोळे सोने, व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. तर दोन्ही घरात चोरट्याने साहित्य विस्कटून टाकले होते. भर दिवसा चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

गावचे पोलीस पाटील नानासाहेब राऊत यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, उत्तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चोरीच्या घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी तज्ञांकडून हाताचे ठसे घेतले. तर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक काही अंतरावर घुटमळत होते. चोरी झालेल्या दोन्ही परिवारातील नागरिक तक्रार देण्याकरिता रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनमध्ये होते. तर घटनास्थळावर पंचनामा करण्यासाठी उत्तर तालुका पोलिसांचे काम उशिरापर्यंत सुरू होते. चोरी झालेल्या दोन्ही घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

गजबजलेल्या ठिकाणी दुपारी चोरीची घटना घडली आहे. चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे लवकरच चोरटे जरबंद होतील. श्वान पथक व चोरट्यांचे ठसे घेतले असून, चोरीचा क्लू मिळाला आहे. चोरीच्या घटनेचा लवकर तपास लागेल.

उत्तर तालुका पोलीस निरीक्षक
नामदेव शिंदे

कांद्यापट्टीचा चेकही चोरट्याने चोरला

गावडी दारफळ येथील शेतकरी दत्तात्रय भोरे यांच्या घरातील कपाटातील रोख रकमेसह, सोने चांदी ऐवज लंपास केला. गुरुवारी कांद्याची विक्री केली होती. मार्केटमधून ४० हजार रुपये कांदापट्टीचा दत्तात्रय भोरे यांना बँकेचा चेक दिला होता. तोही चेक चोरीला गेला आहे.चोरट्यांनी घरातील सोने, चांदी, रोख रक्कम ऐवज चोरून नेल्याने घरातील महिलांना अश्रु अनावर झाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT