Gold theft File Photo
सोलापूर

Solapur News: दुध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास; शेटफळमध्ये थरारक प्रकार

शेटफळ (ता. मोहोळ) येथील ८५ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ: शेटफळ (ता. मोहोळ) येथील ८५ वर्षीय गंगुबाई रामचंद्र करंडे यांची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शनिवारी मोहोळ पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध गंगुबाई करंडे या महिला २२ तारखेला दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास चहासाठी दूध आणण्यासाठी शेटफळ चौकातील किरणा (किराणा) दुकानामध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.

त्यादरम्यान पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावरील हॉटेल ओमसमोर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन येऊन थांबले. त्यातील एकाने त्यांना, "कुठे चाललात?" असे विचारले. त्यावर त्या दुध आणण्यासाठी निघाले असल्याचे म्हणाल्या.

त्यावेळी त्या व्यक्तीने, "चला गाडीत बसा, तुम्हाला दुधाची पिशवी देतो," असे म्हणून वयोवृद्ध महिलेला गाडीत बसविले. प्रवासात त्यांनी करंडे यांना दमदाटी करून त्यांच्या कानातील फुले, झुबे व गळ्यातील मणी असे एकूण एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने बळजोरीने काढून घेतले आणि त्यांना गाडीतून साधारण दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मौजे रोपळे ते उपळाई मधील रस्त्यावर सोडून निघून गेले.

त्यानंतर करंडे यांनी नातेवाईकांच्या मदतीने शेटफळ गाठले. या प्रकरणी गंगूबाई करंडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे. घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT