

सोलापूर : पोलिस कोठडीत असताना भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतलेल्या आरोपीचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. बिटरगाव सांगवी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २३) दुपारी अडीचच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मोहिते याच्याविरुद्ध कलम ६७ आणि ६७ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्याला २१ ऑक्टोबर रोजी पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत असताना त्याने भिंतीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला.
घटनेनंतर पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.