सोलापूर : शेतकरी, शेतमजूर किंवा जनावरे राखणाऱ्या गुराखी यांच्यावर वाघ व बिबट्या या वन्यप्राण्यांनी हल्ला केला व या हल्ल्यात त्यांचा जर मृत्यू झाला तर अशा हल्ल्यांना आता आपत्ती समजले जाईल. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले शेतकरी, शेतमजूर किंवा जनावरे राखणाऱ्या गुराखी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीसह 25 लाख रूपयांची भरपाई दिली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ले झालेल्या संबंधित ठिकाणी ट्रॅप व कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. गावांतील नागरिक कायम सतर्क राहावेत, यासाठी सायरनची सोय केली जाईल. शिवाय, संवेदनशील भागांचे मॅपिंग केले जाणार असून रेस्कूपथक कायम तैनात असणार आहे. सर्व प्रकारच्या वन्यजीवांच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती ठरवले आहे.
माणूस आणि वन्य प्राणी यामधील संघर्ष रोखण्याकरिता शासनाने पूर्व तयारीची जबाबदारीसुध्दा निश्चित केली आहे. हल्ल्यात शारीरिक दिव्यांगत्व प्राप्त झाल्यास त्याच्या तीव्रतेनुसार मदत दिली जाणार आहे. शिवाय, या प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या जखमेनुसार वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या रकमेला आता जलद मंजुरी मिळणार आहे.
जिल्ह्यात बिबट्या व वाघाचे दर्शन
वर्षभरात जिल्ह्यात मोहोळ, मोडनिंब, अकलूज, बार्शी, वैराग या गावाच्या परिसरात बिबट्या व वाघाचे दर्शन झाले होते. बार्शी तालुक्यातील हा बिबट्या खूप दिवसानंतर धाराशिवमध्ये गेला.