शिराळा शहर : औंढी (ता. शिराळा) येथील शेतकरी बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या आणि एक बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. ही घटना शुक्रवार दि. 26 रोजी रात्री घडली.
घटनास्थळी वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी भेट दिली. पंधरा दिवसांपूर्वी शिवरवाडी येथे मादी जातीचा बिबट्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने जेरबंद करण्यात यश आले होते. बबन पाटील यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या आणि बोकड शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून ठार केले. पशुधनावर सातत्याने बिबट्यांचे हल्ले होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शिराळा उत्तर भागातील पाडळी, पाडळीवाडी, खेड बेलदारवाडी, भटवाडी, निगडी, शिरशी, गिरजवडे, करमाळे, औंढी, निगडी, एमआयडीसी परिसरात बिबट्याचा अधिवास वाढला आहे. दिवसा ढवळ्या बिबटे शेतकर्यांना बांधावर, उसाच्या फडात दिसत आहेत. ऊसतोड सुरु असल्याने फड मोकळे होत आहेत. त्याचा परिणाम बिबटे नागरी वसाहतीत दिसून येत आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.