सोलापूर

Solapur news | विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची सांगता

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मिळून ९६ पूजा, पूजेसाठी ९५ किलो चंदनाचा वापर

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठ्ठलाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात करण्यात आली होती. मंगळवार, दि. ९ जून रोजी सांगता पूजा करण्यात आली.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनउटी पूजा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडवा मिळावा, या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणीमातेला देखील यापद्धतीने चंदनउटी लावण्यात येते. या चंदनउटी पूजेची मंगळवारी सांगता पूजा झाली. त्यामध्ये श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची चंदनउटी पूजा अनुक्रमे सदस्य संभाजी शिंदे व लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच सदस्या शकुंतला नडगिरे व व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे आदी उपस्थित होते.

मागीलवर्षीप्रमाणे भाविकांना श्रींची चंदनउटी पूजा ऑनलाइन पद्धतीने बुकींग करण्यास उपलब्ध करून दिली होती. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या पूजेसाठी ९५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. तसेच यंदा चंदनउटी पूजा कालावधीत अधिकमास आल्याने, अधिकमास कालावधीतील पूजा या मंदिर समितीमार्फत करण्यात आल्या होत्या.

१४ लाख ६४ हजारांचे उत्पन्न

चंदनउटी पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे १४ लाख ६४ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेकडे अनुक्रमे रूपये २१,००० व ९,००० इतके देणगी मुल्य होते. दि. १९ मार्च ते ०९ जून कालावधीत एकूण पूजेचे ८२ दिवस उपलब्ध झाले होते. त्यामध्ये अधिक मास वगळता इतर दिवशी श्री विठ्ठलाकडे ५० व रुक्मिणीमातेकडे ४६ पूजा भाविकांसाठी उपलब्ध झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT