Pandharpur News: आषाढी यात्रेत १६ जुलैपासून २४ तास दर्शन

गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती; जुलैमध्ये महालक्ष्मी व व्यंकटेश मंदिरे भाविकांसाठी खुली होणार
Pandharpur News: आषाढी यात्रेत १६ जुलैपासून २४ तास दर्शन
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी एकादशी यंदा शनिवार, दि. २५ जुलै रोजी साजरी होणार असून, पहाटे २.२० वाजता राज्याचे मुख्यमंत्री तसेच मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधी दि. १५ ते २९ जुलै असा निश्चित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने यात्रा नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

दि. १६ जुलै रोजी श्रींचा पलंग काढून भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीची सभा दि. २६ मे रोजी दुपारी १.३० वाजता भक्तनिवास येथे श्री औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करून ही सभा घेण्यात आली.

सभेला शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन-संवर्धन कामांचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

सभेमध्ये आषाढी यात्रा नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये शासकीय महापूजा, २४ तास दर्शन व्यवस्था, दर्शनरांग नियोजन, लाईव्ह दर्शन, सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नछत्र तसेच अन्य सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जतन व संवर्धन कामांच्या आढाव्यात श्री महालक्ष्मी मंदिर व श्री व्यंकटेश मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून जुलै महिन्यात भाविकांसाठी मंदिरे दर्शनास खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराचे मूळ स्वरूप कायम राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सभेत मंदिर समितीच्या सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात राबविण्यात येणाऱ्या “जगद्गुरू अभंग गाथावन” आणि “श्री ज्ञानेश्वरी तपोवन” या अभियानांमध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचा सहभाग नोंदविण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच मंदिर समितीच्या जमिनी जास्तीत जास्त ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे ठरविण्यात आले.

याशिवाय भक्तनिवास येथील ५ बेड व ८ बेडच्या खोल्या वातानुकूलित करणे, २४ तास गरम पाणी उपलब्ध होण्यासाठी हिट पंप यंत्रणेचे अद्यावतीकरण करणे तसेच पंढरपूर शहर व परिसरातील अधिकृत मठांमध्ये शौचालय बांधकाम करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news