श्री क्षेत्र शुक्राचार्य मंदिर File Photo
सोलापूर

Shravan 2024 : श्री क्षेत्र शुक्राचार्य मंदिराची भाविकांना भुरळ

श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची होतेय गर्दी; प्राचीन जागृत देवस्थान, निसर्गरम्य ठिकाण

पुढारी वृत्तसेवा

जुनोनी : सांगोल्यापासून 45 कि.मी., तर कोळेपासून 12 कि.मी. अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र शुक्राचार्य हे ठिकाण आहे. श्रावण अधिक महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविक भक्तांची गर्दी होत असते. डोंगरकपारीत वसलेले शुक्राचार्य मंदिर श्रावण महिन्यात लक्ष वेधून घेत आहे.

सध्या पुरुषोत्तम मासानिमित्त भव्यदिव्य श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ हा कार्यक्रम मठाधिपती तपोनिधी कल्याणगिरी ऊर्फ भास्करगिरी गुरू दिलीपगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने केला जात आहे. तसेच दररोज सकाळी महाराजांच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

श्री क्षेत्र शुक्राचार्य मंदिर

शुक्राचार्य मंदिरात अधिक मासामुळे दुपारच्या सत्रात दर्शनासाठी सोलापूर, सांगोला, सांगली, सातारा या भागातील भाविक मोठ्या संख्येने येतात. श्री क्षेत्र शुक्राचार्य हे खानापूर, आटपाडी तालुक्यांच्या सीमेवर आहे. शुक्रमुनींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. मंदिराचे मुख्य ठिकाण हे आटपाडी तालुक्यातील हिवतड गावाच्या हद्दीत आहे, तर डोंगराच्या वरच्या भागात गणपती मंदिर असून खानापूर तालुक्यात आहे. हे ठिकाण डोंगराच्या कडेकपारीत आहे. तिन्ही बाजूंनी डोंगराच्या रांगा आहेत. डोंगराच्या दर्‍या-खोर्‍यांत मोठ्या प्रमाणात झाडी आहे.

श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवळ दिसून येते, पाण्याचे झरेही वाहत आहेत. सध्या अधिक महिना असल्यामुळे येथे दररोज गर्दी व भाविकांचा ओढा सुरू आहे. या ठिकाणी विक्रेते मोठ्या संख्येने येऊन आपली दुकाने थाटत असतात. अशी आख्यायिका सांगीतली जाते की, शुक्राचार्य हे एक महान योगी होते. त्यांचे तपहरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठविली; परंतु शुक्राचार्य हे ब्रम्हचारी असल्याने स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते डोंगरात अदृश्य झाले. त्या ठिकाणी त्यांचे देवालय पूर्वाभिमुखी आहे. नदीपलीकडे श्री भुवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून सुंदर आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपूर पाहण्यासारखे आहेत.

शुक्राचार्यला जाताना भूपालगड पाहावा

कोळा बानूरगड घाटातून शुक्राचार्यला जाताना भूपालगड लागतो. हा प्राचीन किल्ला आहे. भूपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची भूपालगडावर समाधी आहे. मोगल सरदार दिलेरखानाने 2 एप्रिल 1679 रोजी भूपालगडाला मोर्चे लावले आणि जवळच्या डोंगरावर तोफा चढवून मारा सुरू केला. 17 एप्रिल 1679 रोजी किल्ला दिलेरखानाच्या ताब्यात गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT