सोयाबीन  
सोलापूर

Solapur Soybean production drop rain deficit |पावसाविना सोयाबीनच्या उत्पादनात ८७.४ टक्के घट

पीक कापणी प्रयोगातून अहवाल; खरिपापाठोपाठ रब्बीही संकटात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : यंदाच्यावर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे खरीप पिके हातची गेली असून, प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पीक कापणी प्रति प्रयोगातून हेक्टरी उत्पादकतेत प्रचंड मोठी घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. पीक कापणी प्रयोगांच्या अहवालानुसार सोयाबीनच्या उत्पादकतेत ८७.४ टक्के, मूग ६९.३ टक्के, उडीद ६४.३२ टक्के, बाजरी ५२.२ टक्के आणि मका पिकाच्या उत्पादकतेत ३१.२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

गत जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ४८१.१० मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ २४४.७० मि.मी. म्हणजे ५०.९० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ११० महसूल मंडळांपैकी ९९ मंडळांमध्ये कोरड्या खंडाची नोंद झाली आहे.

दरम्यान, खरीप पिके वाया गेलेली असतानाच रब्बी हंगामातील पिकांची पेरणीच संकटात सापडली आहेत. त्यातच भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सिंचनाचे प्रश्न निर्माण झाल्याने पिण्याचे पाणीही नाही आणि शेतातील उभी पिकेही करपून जात आहेत.

आज शासनाकडे अहवाल सादर होणार

जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून सुमारे ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामेही सरसकट सुरू असून, पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे आज सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून सादर होणार आहे. या अहवालावरूनच मदत निधी निश्चित होणार आहे.

यंदा २.९८ मीटरने भूजल पातळीत घट

गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. परंतु, यंदा कोरडा दुष्काळ पडल्याने जिल्ह्याची भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या तुलनेत २.९८ मीटरने खालावली आहे. उजनी प्रकल्पात ८२.१७ टक्के, सात मध्यम प्रकल्पांत २१.५२ टक्के, ५६ लघुप्रकल्पांत ४.१४ टक्के आणि २० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांत २१.८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील आठ ते नऊ महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन पिण्यासाठी राखीव ठेवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT