

गणेश गोडसे
बार्शी : एआय तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे, तेवढाच त्याचा धोकाही आहे. त्यामुळे तरुणांनी विद्यार्थ्यांनी एआयचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी केले.
विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगपंचावर शुभारंभ झाला. त्याप्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक आ. राजेंद्र राऊत, प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव अतुल लकडे, राजाभाऊ सरवदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, नंदन जगदाळे, पी. टी. पाटील, अरुण देबडवार, जयकुमार शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, पद्मजादेवी मोहिते पाटील, गुणवंत सरवदे, कैलास कारंडे, महेश खरात, प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते. आ. राऊत म्हणाले, बार्शी येथे श्री शिवाजी महाविद्यालयांमध्ये युवा महोत्सव पार पडतोय ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. केदारनाथ काळवणे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये युवा महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू विषद केला. डॉ. बी. वाय. यादव यांनी समयोचित भाषण केले. सूत्रसंचलन डॉ. रविकांत शिंदे, मंजुषा श्रीमंगल यांनी केले. प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी आभार मानले.