मोडनिंब : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि संजीवन समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देणार. यासह अरणच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपये निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. माढा तालुक्यातील भक्तनिवास, वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
संयोजक सावता महाराजांचे वंशाचे रविकांत महाराज वसेकर, प्रभू माळी महाराज तसेच प्रमुखांच्या हस्ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तुळशीचा हार घालून विना तसेच शस्त्र म्हणून विळा देण्यात आला. त्यांना वारकऱ्यांचे उपरणे प्रदान करण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सचिन कलशेट्टी, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, राम शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, रामभाऊ कांडगे, पंढरपूरचे अभिजीत पाटील, बाळासाहेब शिवरकर, सावता महाराजांचे वंशज सावता वसेकर, महाराज प्रभू माळी महाराज, रविकांत वसेकर महाराज,अभिमन्यू उबाळे, केशव महाराज उखळीकर, रखुमाजी महाराज नवले, रणजीत गिरमे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सावता महाराजांनी कर्मयोग सांगितला आहे. सुमारे ८०० वर्षांपूर्वी समाजाला दिशा आणि गती देण्यासाठी त्यांनी प्रेरणादायी कार्य केले आहे. फक्त ४५ वर्ष ते आयुष्य जगले. मात्र त्यांनी दिलेले विचार आजही समाजासाठी प्रेरक आहेत. जीवन जगण्याचा अर्थ अत्यंत छोट्या शब्दात सावता महाराजांनी सांगितला आहे संजीवन समाधी घेणारे ते पहिले संत आहेत म्हणून त्यांना संत शिरोमणी म्हटले जाते.
अरण हे ऊर्जा केंद्र असून या ठिकाणी भक्तांसाठी शंभर खोल्या, वारकरी गुरुकुल, सावता महाराजांचा जीवनपट,वास्तुशिल्प साकारण्यात येणार आहे. शिवरायांनी पराक्रम गाजवले तर संतांनी महाराष्ट्रात समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. जातिवाद निर्माण होणार नाही यांची पुरेपूर काळजी घेतली. संत हे विविध जाती-धर्माचे होते मात्र त्यांनी कधीही जातीवाद केला नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर संतांच्या विचारांची गरज निर्माण झाली आहे. राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. मतांच्या झोळीसाठी मोठे नेते मूग गिळून गप बसले आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे असेच चालू राहिले तर वर्तमान चांगला असेल मात्र भविष्य नसेल अशी खंत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
सावता महाराजांचे फक्त ३७ अभंग आहेत यावर हजारो जण पीएचडी करत आहेत अधिक अभंग असतील त्याचा शोध घ्यावा लागेल १२९५ साली संजीवन समाधी घेणारे संत शिरोमणी सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील पहिले संत आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले. ओबीसी समाजासाठी २ हजार २००कोटी वरून सुमारे ८ हजार कोटी पर्यंत बजेट वाढवले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले यामुळे बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार असल्याची खात्री त्यांनी दिली. शेती, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात सह सरकारची कामगिरी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक आहे. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे असल्याचे ते म्हणाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सावता महाराजांच्या बद्दलची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी सांगितली.
राज्य सरकारचे सध्या महिला आणि मुलींच्या संदर्भात विशेष लक्ष आहे. सावित्रीच्या लेकी या सरकारमुळे आता मोफत शिक्षण घेणार आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक छळ होत आहे. याबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा आणि सावित्रीच्या लेकींना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाहीर भाषणातून केली.
महिलांसाठी मुख्यमंत्री 'लाडकी बहीण योजना' ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. त्यामुळे महिलांनी काही काळजी करू नये फक्त या योजनेचा फायदा घेताना सावत्र भावांपासून सावध राहा असे आवाहन त्यांनी महिलांना करताच सभागृहात सर्वांना हसू आवरले नाही. राज्य सरकार मुलींसाठी मोफत शिक्षण देत असून डॉक्टर, एमबीए यासह सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन मुलींनी भविष्य घडवावे असे असे त्यांनी सांगितले.