सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाले तरी अद्याप ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात 30 नोव्हेंबरची दिलेली डेडलाईन संपली आहे. आता जिल्हाधिकारी आशीर्वाद ऊस दरासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील 35 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम सुरू केला आहे. पूर्वी साखर कारखाने उसापासून साखर निर्मिती करून त्याद्वारे तीन टप्यात ऊस बिल अदा करत होते. नंतरच्या काळात उसापासून साखर आणि इथेनॉल, मळी, पोटॅशसारखे खते, कागद, वीज असे उपपदार्थ तयार करून अधिक उत्पादन मिळवू लागले. केंद्र शासनाने साखर उताऱ्यानूसार एफआरपी निश्चित केली. कारखानदार उतारा चोरी करण्याबरोबरच वजनकाट्याच्या मापात पाप करत असल्याची शेतकरी संघटनेकडून आरोप होत असतानाही शासनाकडे त्याबाबत कडक भूमिका घेतलेली नाही. दरम्यान ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण होऊनही दराची कोंडी फोडलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
आधीच अतिवृष्टीने त्रस्त...
यंदाच्यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उरली सुरली ऊस पिके आधार देतील या भरोशाने शेतकरी आशा धरुन होते. ऊस दरासाठी बार्शी आणि होनमुर्गी येथे आंदोलन होऊनही त्याची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. दरम्यान जिल्हाधिकारी दोनवेळी साखर कारखान्यांची बैठक घेऊन ऊस दर जाहीर करण्याचे आदेश देऊनही कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहेत.