

परतुर : परतुर तालुक्यातील पाडळी शिवारात महावितरणच्या विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मोठा अनर्थ घडला. शेतकरी ज्ञानोबा दादाराव मस्के आणि कुंडलिक उद्धवराव मस्के यांचा उभा ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली. यात ज्ञानोबा मस्के यांचा एक एकर, तर कुंडलिक मस्के यांचा सव्वा एकर ऊसाचे पीक पूर्णपणे भस्मसात झाले.
लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमधून ठिणग्या पडून ही आग लागली. या भीषण दुर्घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला ऊस डोळ्यासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लोंबकळणाऱ्या तारांबाबत केलेल्या दुर्लक्षामुळेच हे नुकसान झाले असल्याचा थेट आरोप नुकसानग्रस्त शेतकरी यांनी केला आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने जळालेल्या ऊसाचा पंचनामा करून शेतकऱ्याला संपूर्ण नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी ज्ञानोबा आणि कुंडलिक मस्के यांनी केली आहे. अन्यथा, नुकसान भरपाईसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.