सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शहरप्रमुख महेश धाराशिवकर आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून हा वाद उफाळून आला असून एकमेकांविरोधात थेट आणि आक्रमक भाषा वापरण्यात आल्याने उबाठा सेनेतील अंतर्गत विसंवाद पुन्हा उघड झाला आहे.
महाविकास आघाडी अंतर्गत जागा सोडून घेण्याची जबाबदारी संबंधित पदाधिकार्यांवर सोपवण्यात आली होती. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्यावर होती. त्यामुळे प्रभाग आठमधील एक जागा उबाठा सेनेसाठी मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीत सदरची जागा काँग्रेसला सोडली. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप शहरप्रमुखांकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी दोघांमध्ये तुफान शाब्दिक युद्ध झाले. जा तुला बघून घेतो, तू कोण आहेस? मुंबईला जा आणि सांगून ये, अशा शब्दांत एकमेकांवर तुटून पडत एकेरी भाषेचा वापर केला गेला. हा वाद इतका टोकाला गेला की उपस्थित उबाठाचे आणि मनसेच्या पदाधिकार्यांना मध्यस्थी करावी लागली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेतील हा अंतर्गत कलह निवडणूक जाहीर झाल्यापासून चव्हाट्यावर येत आहे. स्थानिक पदाधिकार्यांतील हा वाद पक्षश्रेष्ठीसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर अद्याप दोन्ही नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी ‘अंदर की बात’ आता रस्त्यावर आल्याने उबाठा सेनेची मोठी बदनामी होत आहे.
बैठकीत राडा
प्रभाग आठ आणि सहामधील जागेवर मनसेने दावा सांगितला आहे. प्रभाग सहामधील चारही जागा वानकर यांच्यासाठी शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. प्रभाग आठमधील ओपन आणि ओबीसी जागेवरून शिवसेना-मनसे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर काँग्रेसला प्रभाग सहामध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी बैठकीत राडा केला.