सांगोला येथे कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला Pudhari
सोलापूर

Solapur Bandh News | नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ सांगोला बंद; तहसील कार्यालयावर मोर्चा

जेऊर, केम, मळोली येथे बंदला नागरिकांचा, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

NEET Paper Leak Protest

सांगोला : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी सांगोला येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध समाजघटकांच्या सहभागाने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

महात्मा फुले चौकातून निघालेल्या मोर्चाने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत तहसील कार्यालय गाठले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि आंदोलनकर्त्यांवरील लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. विविध मान्यवरांनी आपली मते मांडली. बंद आणि मोर्चादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला जेऊरचा पाठिंबा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

केम : जेऊर येथे बंद पाळण्यात आला. संभाजी ब्रिगेड, व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी पुकारलेल्या या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्यांनाही पाठिंबा जाहीर करण्यात आला.

बंददरम्यान बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आस्थापने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बंद शांततेत पार पडला असून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनांवरील कथित दडपशाही थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला केमचा पाठिंबा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

केम : केम येथे बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी दिलेल्या बंदच्या हाकेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

यावेळी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला मळोलीचा पाठिंबा; बाजारपेठ बंद

मळोली : मळोली (ता. माळशिरस) येथे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. गावातील बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त केला.

NEET प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव यांच्यासह विविध मान्यवर, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT