

सोलापूर : मागील दोन-चार दिवसांपासून होणारा सततचा पाऊस आणि त्यामुळे ओव्हर फ्लो झालेले ड्रेनेज याचा थेट प्रादुर्भाव परिसरातील बोरिंग आणि जलवाहिन्यांमध्ये झाल्याने एकाच इमारतीतील ४० जणांस अतिसाराची लागण झाल्याचे मंगळवारी उघड आले.
होटगी रोड परिसरातील आसरा चौकात असणाऱ्या एस. बी. प्लाझा या इमारतीतील जलवाहिनीमध्ये दूषित मैलामिश्रित पाणी गेल्याने हा प्रकार घडला आहे. मुळात येथे असणारी ड्रेनेज लाईन ही खूप जुनी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु एकाच वेळी ४० जणांना लागण होणे, याचे गांभीर्य महापालिकेने घेत परिसरातील ड्रेनेज लाईन त्वरित बदलणे ही तितकेच गरजेचे आहे. वारंवार तक्रार करून देखील या गोष्टीची दखल घेतली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परिसरामध्ये साफसफाई, स्वच्छता अभियान राबवून प्रादुर्भाव कमी होण्यासाठी परिसरात रसायनाची फवारणीही करून घेतली.