सोलापूर

सोलापूर : मोहोळ ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता

मोहन कारंडे

पुढारी वृत्तसेवा; रमेश दास : मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली. बुधवारी शासन निर्णय निर्गमीत झाल्याने येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे. यामुळे अनेक गरजूंना वेळेत उपचार मिळणार आहेत.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या विशेष सहकार्याने व माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांमुळे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

मोहोळ येथील पूर्वीच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आता ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोहोळ शहर हे पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग व मोहोळ-आळंदी पालखी महामार्गावर असून येथे सतत मोठे अपघात होतात. मात्र अपघात ग्रस्तांना तातडीचे वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्याने रूग्णांना मृत्यूशी झुंज देत मृत्युमुखी पडण्याची वेळ नेहमीच येत होती. शासनाच्या या निर्णयानंतर मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी महोळ रुग्णालयाच्या समोर एकत्र येऊन लाडू, पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि शासनाचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरास लेखी आदेशाने मान्यता दिली आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
– यशवंत माने, आमदार मोहोळ

ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्याने अपघातग्रस्तांना तातडीचे वैद्यकीय उपचार मिळणार असून अनेकांचे प्राण वाचणार आहेत.
– यशोदा कांबळे,सामाजक कार्यकर्त्या

सोयी-सुविधेत होणार वाढ

३० ऐवजी ५० बेड संख्या झाल्यानंतर या उपजिल्हा रुग्णालयात ४ वैद्यकीय अधिकारी, वर्ग ३ ची आधिसेविका -१, परिसेविका-२, आधिपरिचारिका – ५, औषध निर्माता – १ अशी ९ पदे तसेच वर्ग ४ मधील बाह्यरुग्णसेवक-१, शस्त्रक्रिया परिचर-१, कक्षसेवक-१, रुग्णोपचारक – ३ व शिपाई -१ अशी ७ पदे कार्यान्वित होणार आहेत.

२६ कोटींचा निधी मिळणार

रुग्णालयाचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थान यासाठी अंदाजे २५ कोटींचा निधी मिळणार असून रुग्णालयात उपकरणे व साधनसामग्री फर्निचर यासाठी १ कोटींचा निधी मिळणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT