"माझ्या भावाला कुठलाही आजार नव्हता. फक्त आणि फक्त दारुच्या व्यसनाने तो मेला, असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करत माझं एकवेळा ऐका. मी गाववाल्यांना, सरपंचांना हात जोडतो, सगळ्यांच्या पाया पडतो, गावातील आणखी दहा जण अशीच मरु नयेत, असे वाटतं असेलं तर आजपासूनच गावातील दारु बंद करा. मी गावातील दारु बंद करतो, अशी शपथ माझ्या भावाच्या मातीला लावून सगळ्यांनी घ्या," अशी आर्त हाक भावाला गमावलेल्या तरुणाने ग्रामस्थांना दिली. तरुणाने गावात दारुबंदी करावी, या मागणीसाठी स्मशानभूमीत केलेल्या आक्रोशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अकोले गावातील विनोद सरवदे यांच्या भावाचा मृत्यू झाला. त्याच्या माती सारवणे विधीवेळी विनोद भावाच्या आठवणीने व्याकूळ झाले. त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. आक्रोश करत ते म्हणाले, "आपल्या शेजारच्या गावाने दारुबंद केली आहे. त्यामुळे येथील सरपंच आदर्श ठरला आहे. मी गावातील सगळ्यांसमोर हात जोडून कळकळीची विनंती करतो, संगळ्याच्या पाया पडताे, गावातील आणखी दहा जण मरु नयेत असे वाटत असेल तर गावातील दारु विक्री बंद करा, अशा आक्रोश विनोद सरवदे यांनी केला. आजपासून गावात कोणीही दारुचा एक थेंबही विकणार नाही, असा निर्णय व्हावा. सरवदे कुटुंबीय या निर्णयाची वाट बघत आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.
"माझ्या भावाचा मृत्यू केवळ दारु पिल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी साांगितले आहे. यापुढे गावात कोणी दारुची विक्री केली तर माझ्याशी गाठ असेल. दारु विक्री करणार्याच्या घरातल्याचा मृतदेह येथे जळत असेल. मी जेलमध्येही जाण्यास तयार आहे, असा इशारा यावेळी विनोद यांच्या दुसर्या भावाने दिला. आजपासून दारुबंदीचा निर्णय घ्या तर माझ्या भावाच्या मातीला हात लावा. तुम्ही निर्णय घेतला नाही तर आमचं आम्ही बघतो, असा आक्रमक पवित्राही त्यांनी यावेळी घेतल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यावेळी ग्रामस्थाने सांगितले की, गावातील आठ ते दहा जण दारुच्या आहारी गेले आहेत. कालच गावातील तिघांची लिव्हर टेस्ट झाली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दारुमुळे आपण एका तरुणाला गमावलेआहे. दारुच्या व्यसनामुळे उद्या आपल्याला गावातील ३० ते ४० वर्षांच्या दहा तरुणांचे मृतदेह अत्यंसंस्कारासाठी आणावे लागतील, याची जाणीव ठेवा. दारुमुळे अनेक महिला विधवा होत आहेत. गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामस्थांनी निर्धार केला तर आजपासून दारुबंदीचा निर्णय लागू होईल. आजच दारुबंदीचा निर्णय घ्या. अन्यथा आम्ही कोणालाही मातीला शिवू देणार नाही. तसेच आम्ही येथून हालणार नाही, असा पवित्रा सरवदे कुटुंबीयांनी घेतला.
यावेळी दारुविक्री करणार्याने आजपासून गावातील दारुविक्री बंद करावी, असे सांगण्यात आले. दुसर्या गावातून कोणी दारुविक्री करायला आले तर सर्व ग्रामस्थांनी त्याला विरोध करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच यापुढे गावात कोणी दारु पिताना दिसला तरी त्याचा चांगला चोप दिला जाईल, असाही इशारा यावेळी देण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे. यावेळी अकोल गावच्या उपसरपंचांनी आजपासून दारुबंदीचा निर्णय होईल, असे सांगितले.