Crime News File Photo
सोलापूर

Solapur Thief | ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे मुंढेवाडीत केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या

सीना नदीकाठावर दोघांना पकडले; चार चोरीच्या गुन्ह्यांची कबुली

पुढारी वृत्तसेवा

Thief Caught Mohol

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी व अर्जुनसोंड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीपंप, विहिरी व बोअरवेलला जोडलेल्या विद्युत केबल चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी सतर्कता वाढवत रात्रगस्त सुरू केली. याचवेळी सीना नदीकाठावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस चौकशीत त्यांनी चार केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आहे.

मुंढेवाडी-अर्जुनसोंड परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत चोरटे शेतातील विद्युत केबल कापून नेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच शेतीपंप बंद पडून पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सीना नदीच्या दिशेने विनानंबर दुचाकीवरून दोन जण येताना युवकांना दिसले. संशय आल्याने त्यांनी त्यांना अडवून चौकशी केली. त्यांच्या ताब्यात विद्युत केबल आढळून आली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने युवकांनी तातडीने मोहोळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी परिसरातील चार चोरीच्या घटनांची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरीचा माल कुठे विकला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेचे कौतुक करत पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी संबंधित युवकांचा सत्कार केला. ‘माझं गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून पोलीस, पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलाच्या समन्वयाने ग्रामीण भागात रात्रगस्त सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT