

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफीबाबत मंगळवारी (दि.६) परिपत्रक जारी केले.
या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विनाशुल्क भरून घेण्याच्या सूचना संलग्न महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या १२ संकुलांसह ११५ संलग्नित महाविद्यालयांतील सुमारे ७० हजार विद्यार्थी पहिल्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी सुमारे १११ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील वर्गांमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. फी माफीबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्या सहीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विनाविलंब व विनाशुल्क भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी विद्यापीठातील कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठाने तातडीने परिपत्रक जारी करून कार्यवाही सुरू केली. विद्यार्थीनिहाय, अभ्यासक्रमनिहाय आणि सत्रनिहाय शुल्क प्रतिपूर्तीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह २६ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार महाविद्यालयांना परीक्षा शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे.