केळी निर्यातीत सोलापूरचा सर्वाधिक वाटा 
सोलापूर

Banana export : केळी निर्यातीत सोलापूरचा सर्वाधिक वाटा

केळी हबसाठी संशोधन केंद्राची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा

संगमेश जेऊरे

सोलापूर : परदेशात होणाऱ्या केळी निर्यातीत राज्यातील सर्वाधिक वाटा हा सोलापूर जिल्ह्याचा असून, महाराष्ट्र राज्यातील एकूण केळी निर्यातीपैकी 66.43 टक्के केळी सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. त्यामुळे केळी उत्पादनात जिल्ह्याची मोठी घोडदौड सुरू असून, संशोधन केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे.

राज्याचा देशातील एकूण केळी उत्पादनात 14.26 टक्के इतका महत्त्वपूर्ण वाटा आहे. भारतातून होणाऱ्या एकूण केळी निर्यातीपैकी सुमारे 63 टक्के निर्यात केवळ महाराष्ट्रातून केली जाते. सोलापूर जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध असून, मागीलवर्षी महाराष्ट्रातून झालेल्या 12,43,899 मेट्रिक टन केळी निर्यातीपैकी सुमारे 8,26,322 मेट्रिक टन निर्यात सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. म्हणजेच राज्याच्या केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा वाटा 66.43 टक्के इतका आहे. ही बाब ठळकपणे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांच्यासमोर मांडली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत ‌‘केळी संशोधन केंद्र‌’ स्थापन करण्याची मागणी होत आहे. याबाबतचे मागणी पत्र खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन केली आहे.

32000 हेक्टरवर लागवड

करमाळा तालुक्यातील शेलगांव (वां) येथे सुमारे 100 एकर शासकीय जमीन उपलब्ध असून, विद्यमान राज्य फळ नर्सरी तसेच शुष्क क्षेत्र संशोधन केंद्राच्या पायाभूत सुविधांमुळे केळी संशोधन केंद्रासाठी हे ठिकाण सर्वात योग्य ठरणार आहे. सध्याच्या हंगामात जिल्ह्यात सुमारे 32,000 हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड झाली आहे.

संशोधन केंद्र का हवे

केळी उत्पादनात जागतिकस्तरावर स्पर्धात्मक क्षमतेसाठी वैज्ञानिक संशोधन, नवीन वाणांची निर्मिती, कीड-रोग व्यवस्थापन, प्रशिक्षण सुविधा अत्यावश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथे केळी संशोधन केंद्र उभे राहिल्यास त्याचा सोलापूर जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT