सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा
राज्य व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्वांनी पालन करावे. सर्वांनी संपूर्ण लसीकरण आणि कडक निर्बंध पाळने गरजेचे आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी रात्री जारी केले. आदेशात म्हटले आहे की, शहरातील सर्व नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करून दंड आकारण्यात येईल. नागरिकांनी शहरात आयोजित तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या ठिकाणी जाताना संपूर्ण लसीकरण केलेले असावे. शहरातील कोणतेही दुकान, आस्थापन, मॉल समारंभ, संमेलन, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे.
अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. शहरातील सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा http://epassmsdma.mahait.org किंवा telegram – MahaGovUniversalPass Bot हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल.
अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय, संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकिय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशांसाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.
जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खासगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
सोलापूर शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल. किंवा त्यांनी ७२ तासांसाठी वैध सलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक राहील.
चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. तर संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे निरिक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवतील.
सर्व संस्थांनी आवश्यक हँड सॅनिटायझर, साबण, पाणी, तापमापक इत्यादी गोष्टी ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क नेहमी वापरावा. (रुमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र आहे. जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर ठेवा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात धुवा. नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करणे टाळा. खोकताना किंवा शिकताना टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरेले टिश्यू पेपर नष्ट करा.
जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका- तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर ठेवा. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता नमस्कार करा. कोविड विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी ५०० रुपये दंड करण्यात येईल. तर संस्थांना किंवा आस्थापनांना १० हजार ते 50 हजार रुपये पर्यंत दंड करण्यात येईल.