Solapur
स्वत:च्या मुलांनी वडिलांच्या अंत्यविधीला नकार दिला आहे  Pudhari file photo
सोलापूर

Solapur | वडिलांच्या अंत्यविधीला मुलांनीच दिला नकार, वृद्धाश्रमातील ही घटना डोळ्यात आणेल पाणी

पुढारी वृत्तसेवा
भारत नाईक

पोखरापूर (सोलापूर) : कुणाचं कितीबी वैर असू द्या, पर मेल्यावर समद संपतं, असे जुनी जाणकार वयोवृद्ध म्हणायचे. आजही त्यांनी दिलेल्या या संस्कारांची शिदोरी अनेकजण जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील वृद्धाश्रमात घडलेल्या एका घटनेने मात्र संस्कारीक पिढीबद्दल न बोललेलेच बरं असे म्हणण्याची वेळ आली आहे. वृद्धाश्रमात असलेल्या ७६ वर्षीय वडिलांच्या अंत्यविधीला यायलाच त्यांच्या दोन पोरांनी चक्क नकार देत वृद्धाश्रमानेच अंत्यविधी करावा, असे लिहूनही दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे असलेल्या वृद्धाश्रमात एक वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहामुळे घराबाहेर काढलेल्या वयोवृद्ध आजोबांना ग्रामस्थांनी आणून सोडले होते. वर्षभरामध्ये अनेक शारीरिक व्याधींचा सामना करत आजोबा कसेबसे राहिले. वृद्धाश्रमातील इतर सहकाऱ्यांमध्ये मन रमवायचा प्रयत्न करत होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. वृद्धाश्रमातील प्रशासनाने त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांना याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती देऊनही त्या आजोबांना पाहायला कोणीही गेले नाही.

उपचारानंतर ते आजोबा परत वृद्धाश्रमात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा दि. २३ जुलै रोजी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पुन्हा वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांच्या दोन्ही मुलांना याबाबतची माहिती दिली. परंतु, दोन्ही मुलांनी त्यांना घेऊन जाण्याबाबत तसेच अंत्यविधी करणेबाबत सकारात्मकता दाखवली नाही. अखेर ग्रामस्थांनी कसेबसे एका मुलाला वृद्धाश्रमात आणून त्याच्याकडून त्या आजोबांच्या अंत्यविधीची लेखी संमती घेतली. अत्यंत जड अंतकरणाने वृद्धाश्रम प्रशासनाने सोलापूर येथे त्या वयोवृद्ध आजोबांचा अंत्यविधी केला.

ते आजोबा जरी अनंतात विलीन झाले असले तरी, कागदोपत्री सुसंस्कृत झालेल्या समाजासमोर आणि वयोवृद्ध पिढीची साथ सोडलेल्या या पिढीसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरंच समाजातील ही संस्कारीत पिढी एवढी निष्ठूर झाली आहे का? दगडालाही पाझर फुटावा अशा "बाप" नावाच्या संघर्षाचे झाड तुटले असतानाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांना का कशी मायेची माती चिटकली नाही? आयुष्यभर राब राब राबून मुलांना उभे करण्याची धडपड सुरू आहे. त्यातून किमान म्हातारपणी तर मुलांच्या मायेचा आधार मिळेल, या आशेवर बसलेल्या अनेक वडिलांना या घटनेने धक्काच बसला असून इथे ओशाळली माणुसकी अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात आहे.

वाईट वाटलं, निशब्द झालो.... त्या वयोवृद्ध आजोबांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या दोन्ही मुलांना कळविली. त्यावेळी त्यांनी घेऊन जायला तसेच अंत्यविधीला असमर्थता दाखवली. त्यातील एक मुलगा आला, त्याने आम्हाला संमती लिहून दिली, वडिलांचे अंतिम दर्शनही न घेता तो निघून गेला. वृद्धाश्रमाने जड अंतकरणाने त्या आजोबांवर अंत्यसंस्कार केले. वाईट वाटलं, मुलांनी जन्मदात्यालाच परकं केलं.
प्रसाद मोहिते, संचालक, प्रार्थना फाउंडेशन, शिरापूर, ता. मोहोळ

लय अवघड हाय गड्या, उमगाया बापं रं...

ज्याने जग दाखविले, अनंत अडचणीचा सामना करत जगायला शिकवले त्याच मुलांनी वडिलांना परकं केलं. कुटूंब व्यवस्थेच्या नातेसंबंधांमधील सगळ्यात कणखर, कष्टाळू भूमिका वडिलांची डोळ्यासमोर येते. समाजातील प्रत्येक मुलाला वडील या शब्दाचा अर्थ कळून त्यांच्याबद्दलची तळमळ जाणवत नाही, तोपर्यंत वृद्धाश्रमांचे दरवाजे बंद होणार नाही. नातेसंबंधांमधील कोरडेपणा संपला नाही तर येणाऱ्या काळात कुटूंब व्यवस्थेसमोर मोठा धोका निर्माण होणार आहे यात शंका नाही.

SCROLL FOR NEXT