Brother-sister death in Solapur on the same day
सोलापुरात एकाच दिवशी बहीण-भावाचा मृत्यू  Pudhari News Network
सोलापूर

सोलापुरात तासाभराच्या फरकाने बहीण-भावाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील नगोर्ली येथील भावा-बहिणीचे तासाभराच्या फरकाने शुक्रवारी (दि.२८) मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. नगोर्ली विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कैलास विठ्ठल नवले (वय४२) हे विहिरीतील विद्युतपंप सुरू करण्यासाठी जात असताना पाय घसरून विहिरीत पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने शुक्रवारी (दि.२८) दु.१.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या थोरली बहीण सुदामती बाळासो करळे (वय ५५ रा.नालगाव ता.परांडा, जि.धाराशिव) यांचेही शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. दोघा बहीण- भावाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुदामती करळे यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच नवले कुटुंबातील नातेवाईक नालगाव येथे गेले होते. कैलास नवले हेही जाणार होते. पण शेतात ऊस लागवड असल्याने ते थोड्या उशिराने जाऊ, म्हणून शेतात गेले. तेथे विद्युतपंप सुरू करण्यासाठी दुपारी विहिरीवर गेले असता ते पाय घसरून विहिरीत खडकावर पडले. यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला असता तेथे ग्रामस्थांनी धाव घेतली.

कैलास नवले हे माजी सरपंच चंद्रकांत नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले यांचे बंधू होते. नवले हे हरहुन्नरी कार्यकर्ते म्हणून परिचित होते.बहीण-भावाच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे.

पालखी सोहळ्यात सामील होण्याची नवले यांची इच्छा अपूर्ण

कैलास नवले व त्यांच्या पत्नी हे दोघेही पती-पत्नी शनिवारी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करण्यासाठी जाणार होते. पण आकस्मिक निधनाने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.

SCROLL FOR NEXT