सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपात उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे स्थिती असून, त्या पार्श्वभूमीवर आ.सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका जाहीर केल्याने भाजपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. देशमुख यांच्या भूमिकेने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने शुक्रवारी दुपारी विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. दरम्यान भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका महापालिका निवडणुकीवर होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याची माहिती सूत्राने दिली असून, त्याबाबत आज शनिवारी दि. 27 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
भाजपात गेल्या महिनारापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे. माजी आ.दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाने आ.सुभाष देशमुख गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे सकाळी आ. विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी आ. सुभाष देशमुख यांनीही भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेत भाजपाकडून निष्ठावंताना संधी न मिळाल्यास त्या कार्यकर्त्यांना पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता भाजपात निष्ठावंत विरुद्ध आयाराम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री गोरे हे नियोजित दौऱ्यानुसार शुक्रवारी दुपारी एक वाजता सोलापुरात आल्यानंतर त्यांचा पुढील वेळ ही राखीव ठेवण्यात आली होती. परंतु सकाळी आ.विजयकुमार देशमुख यांनी जाहिर केलेल्या भूमिकेमुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तातडीने सायंकाळी मुंबईकडे विमानाने प्रयाण केले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ते मुंबईवरून पुण्याला येणार होते. परंतु रात्री ते मुंबईतच थांबून आज शनिवारी सकाळी पुण्याला येणार असल्याचे सांगण्यात आले.
आ.कोठे अलिप्त
गेल्या तीन दिवसांपूर्वी आ.देवेंद्र कोठे यांनी होटगी रोडवरील एका हॉटेल मधून बैठकीतून नाराज होऊन निघून गेले होते. तेंव्हापासून ते सध्या कुठेही सक्रिय दिसत नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर भाजपचे दोन्ही देशमुख आमदार हे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सोलापुरातच होते.