सोलापूर

Solapur fake seeds racket| बार्शी तालुका कृषी विभागाची मोठी कारवाई: 7.50 लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

हजारो शेतकरी फसवणुकीपासून वाचले

पुढारी वृत्तसेवा

गणेश गोडसे

बार्शी : बार्शी तालुका कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत सुमारे 7.52 लाख रुपये किमतीचे नकली उडीद बियाणे जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे.

मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयास बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून कारवाई करण्यात आली.

स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव ता. परांडा जि. धाराशिवचे प्रोपरायटर श्री रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद पिकाच्या NUL 7 ‘विश्वास’ या वाणाची हुबेहूब नक्कल केलेले बियाणे विक्रीसाठी आणले होते.

कृषी विभागाच्या पथकाने स्वराज कॉलनी, बार्शी येथील गोडाऊनवर छापा टाकला. तपासणी दरम्यान गोडाऊनमध्ये 216 बॅग आणि यापूर्वी विक्री केलेल्या 168 बॅग अशा एकूण 384 बॅग (प्रत्येकी 5 किलो) नकली उडीद बियाणे आढळून आले. जप्त केलेल्या बियाण्याची एकूण किंमत 7,52,640 रुपये आहे. प्रति बॅग 1960 रुपये दराने हे बियाणे विकले जात होते. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जिल्हास्तरीय भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी बार्शी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुण नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी बार्शी गणेश पाटील यांचा समावेश होता. या वेळी निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सचिन देशमुख उपस्थित होते.

जप्त केलेले सर्व बोगस बियाणे ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित बोगस बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी. संशयास्पद बियाणे आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. या कारवाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी मोठी आर्थिक व पिकांची हानी टळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT