Illegal Gambling Sangola
सांगोला : सांगोला तालुक्यातील सोनंद येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत तब्बल २ कोटी ६८ लाख ७२ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण सांगोला तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सोनंद (ता. सांगोला) येथे "हॉटेल मटन भाकरी"च्या मागील सिमेंटच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती खात्रीशीर असल्याने पंढरपूर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.
२९ ऑगस्ट रोजी पोलीस पथकांनी छापा टाकला असता, त्या ठिकाणी ५० जण ५२ पत्यांचा खेळ खेळून पैशांची पैज लावताना रंगेहात पकडले गेले. यावेळी कॅसिनो काउंटरवर देशी-विदेशी दारूसह अन्य साहित्यही आढळून आले.
या धाडीत जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत तब्बल ₹२,६८,७२,१९५ एवढी आहे. यात रोख रक्कम – ₹१६,०९,४८०,६२ मोबाईल – ₹१३,९१,१००, २६ चारचाकी वाहने – ₹२ कोटी ९ लाख, ६१ दुचाकी – ₹२९,६०,०००, देशी-विदेशी दारू – ₹११,१६५, जुगार साहित्य, पत्त्यांचे डाव, खुर्च्या, टेबल, कपाट, पैसे मोजण्याची मशीन आदी वस्तू.
सांगोला पोलीस ठाण्यात पकडलेल्या सर्व ५० जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७, कलम ४ आणि ५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९, कलम ६५ (ई) याद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभावरी रेळेकर, भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, निलेश रोंगे, कामतकर, मंगेश रोकडे, सुजित उबाळे, अरुण कोळवले, सातव, शितल राउत, संतोष गायकवाड, सिताराम चव्हाण, शिंदे, ढोणे, गुटाळ, गवळी, राहुल लोंढे, आवटे, जाधव, मदने, हुलजंती यांचा सक्रिय सहभाग होता.
गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या जात आहेत. यात अवैध वाळू उत्खनन, मटका-जुगार, गुटखा, देशी-विदेशी दारू यांचा समावेश आहे. सलग कारवाईमुळे तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या या धाडसिक कारवाईचे स्वागत केले जात आहे.