

सांगोला : येत्या 15 जूनपासून चालू होणार्या नवीन शैक्षणिक वर्षापासून जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील. अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जवळा (ता. सांगोला) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावाद्वारे घेतला आहे. या निर्णयाचे सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून अनुकरण करावे. जिल्हा परिषद शाळांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील सध्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपेक्षित, वंचित, दलित, गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षणात ही स्पर्धा लागल्यामुळे आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पाल्यांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पटसंख्येअभावी गाव, वाडी वस्ती, दलित वस्तीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास जिल्हा परिषद शाळा बंद होतात की काय, अशीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जवळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या सहमतीने एकमुखी ठराव घेऊन जे पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील, अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तात्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. आबा पाटील यांनी ग्राम स्तरावर धाडसी निर्णय घेऊन आपल्या कामकाजाची चूणक दाखवली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे ग्रामविकास खात्याचा सक्षमपणे कारभार चालवीत आहेत. त्यांनी ग्रामीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी जयकुमार गोरे यांच्या रूपाने ग्रामविकास खात्याला सक्षम नेतृत्व दिल्याने जिल्हा परिषदेना चांगले दिवस आहेत. त्यांच्या विचाराला अधिक बळकटीकरण करण्यासाठी जवळा ग्रामपंचायतीचा आदर्शवादी प्रयत्न निश्चितपणाने सोलापूर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत समोर प्रेरणादायी ठरेल. असा विश्वासही साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलीफा, विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील साळुंखे, ग्रामसेवक दत्तात्रय रसाळ, माजी उपसरपंच बाबासाहेब इमडे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.