सोलापूर : सोलापूर शहर परिसरात सलग पाचव्यादिवशी पावसाची रिपरिप सुरुच असून, शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने सूर्यदर्शनही घडले नाही. हवामान विभागाकडे सायंकाळपर्यंत 3.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या सोमवार, दि. 25 ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरू असून, या पावसामुळे शाळकरी मुले, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापना कर्मचार्यांना पावसातच छत्री आणि रेनकोटचा आधार घेऊन शाळा, महाविद्यालये, कार्यालये गाठावी लागली. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस दुपारीपर्यंत अधूनमधून विश्रांती घेत बरसत राहिली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जुळे सोलापूर, आसरा, सैफुल, भारती विद्यापीठ, सात रस्ता परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. तर सायंकाळी सहानंतर शहरात सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
गुरुवारी रात्री शहरातही ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. 25 ऑगस्ट रोजी 0.1 मिमी, 26 ऑगस्ट रोजी 13.5 मिमी. 27 ऑगस्ट रोजी 39.1 मिमी, 28 ऑगस्ट रोजी 2.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहर परिसर, बार्शी, करमाळा, मोहोळ तालुक्यातही पावसाची संततधार सुरू असल्याने सीना नदी पुन्हा एकदा इशारा पातळीत वाहण्याची शक्यता आहे.
उजनी 105 टक्क्के भरले...
उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करून शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट रोजी 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. उजनीत 105 टक्के भरल्याने उजनीतून विसर्ग सुुरु करण्यात आला आहे.
कोळेगाव प्रकल्पातून सीनेतही विसर्ग
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर नियंत्रणासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजल्यापासून 1896 क्युसेकने सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन ती 2 हजार 528 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीना नदीही दुथडी भरून वाहणार आहे.

