सोलापूर : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला आहे. साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केले नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसात दर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा माजी खा. तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शुक्रवारी (दि. 5) शेट्टी हे सोलापूर दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जामगुंडी मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शेट्टी यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांची उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 3400 ते 3500 रुपयांचे दर जाहीर केले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात काही साखर कारखान्यांनी फक्त 2800 रुपयांचा दर जाहीर केला. हा दर शेतकर्यांना परवडणारा नाही. त्यामुळे 3500 रुपयांचा दर साखर कारखान्यांनी जाहीर करावा अन्यथा कारखान्यांवर जाऊन कारखाने बंद पाडणार आहे.
अनेक कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे. त्या कारखान्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची आहे. बरेच कारखाने हे राजकारण्यांचे असल्यामुळे कारवाई थांबली आहे. अशा कारखान्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
व्याजासह पैसे द्यावेत
एफआरपी थकविलेल्या कारखान्यांनी व्याजासह पैसे देण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांनी व्याजासह पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे कारखानदार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.