

सोलापूर/ गुळवंची : भरधाव वेगाने जाणारी कार खांबाला धडकून कारमधील दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.2) मध्यरात्री दीडच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी जवळील बालाजी अमाईन्स कंपनीसमोर घडली. मृत दोघेही उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावचे रहिवासी आहेत.
सुधाकर विलास गिरे (वय 44) आणि भारत शंकर विटकर (वय 60, रा. मार्डी, ता. उ. सोलापूर) हे दोघे स्विफ्ट कारने मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तुळजापूरहून मार्डीकडे जात होते. तामलवाडी जवळील बालाजी अमाईन्स कंपनीसमोर त्यांच्या कारने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खांबाला जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघेही जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. गावातील दोघांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने मार्डी गावावर शोककळा पसरली.